पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/310

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुखावल्या गेल्या' अशी आरोळी ठोकण्याची (हिंदू- मुस्लीम-शिखांसह सर्व धर्मात आणि जाती-जमातीत वाढत जाणारी) प्रवृत्ती पाहता नॉनफिक्शन स्वरूपाचं लिखाण मी आजवर केलं नाही. पण हा सारा अभ्यास ललित अंगानं मांडताना माझ्या प्रतिभेचा कस लागत गेला, त्यात मी ब-यापैकी यशस्वी होत गेलो.
 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही माझी आजवरची सर्वात महत्त्वाची कलाकृती, तिच्यासाठी इस्लामसोबत मार्क्सवाद आणि आंतरराष्ट्रीय राजकारण व शीतयुद्धाचाही अभ्यास करावा लागला. अफगाणिस्तानची पाश्र्वभूमी असल्यामुळे त्या देशाचा इतिहास, भूगोल, तिथल्या परंपरा, सांस्कृतिक व कौटुंबिक जीवन आणि राजा झहीरशहापासून मुल्ला मोहमद इमरपर्यंतच्या नेत्यांमुळे त्या देशाच्या समाजजीवनावर झालेला परिणाम हे सारं अभ्यासून, त्या पाश्र्वभूमीवर अफगाणी लोकांची सुख - दु:खं मी रेखाटली. त्या निमित्तानं एक देश मी केवळ वाचला नाही. तर अनुभवला, मनात मुरवला आणि मराठीत क्वचितच आढळणारा ‘फॅक्ट' व 'फिक्शन'चं मिश्रण असणारी ‘फॅक्शन' हा लेखनाचा फॉर्म यशस्वीपणे (अर्थात् लेखनाची मागणी व गरज म्हणून) हाताळला. हा सारा लेखनप्रवास माझ्यासाठी रोमहर्षक होता. एक माणूस म्हणून, एक लेखक म्हणून व एक अभ्यासक म्हणून मी त्यातून विकसित होत गेलो, समृद्ध होत गेलो.
 आमचे एक प्रकाशक मित्र गमतीनं म्हणतात, “कुणाशीही बोलताना माझ्या डोक्यात त्या व्यक्तीचा अनुभव, व्यवसाय वा त्यांचा ज्या विषयाचा अभ्यास आहे, त्यावर पुस्तक होऊ शकेल का याचा विचार मी करीत असतो. आम्ही एका अर्थाने चांभारच, जसं त्याचं लक्ष वहाणेवर असतं, तसंच आम्हा प्रकाशकांचं विषयावर व पुस्तकावर.” लेखकाचाही स्वभावधर्म असाच असावा, असं माझं मत आहे. निदान मी तरी तसा लेखक आहे. मागील दोन्ही लेखात मी महानगरपालिका आयुक्त असताना रस्तेबांधणीच्या वेळी झालेल्या राजकीय व पक्षीय त्रासाबद्दल थोडं लिहिलं होतं, भाष्यही केलं होतं. त्या कालखंडातून जाताना मी घरी पत्नी व मित्रांना सांगायचो, की हे अनुभव लेखनासाठी उपयुक्त आहेत. रस्त्याच्या पाश्र्वभूमीवर 'अग्निपथ नावाची कादंबरी मी लिहिणार आहे. कधी, ते माहीत नाही, पण डोक्यात ती फिट बसली आहे.

 लेखकाला हरघडी आपल्यातला लेखक जागा ठेवून जगता आलं, तर नित्य नवीन काही सुचत जाईल. प्रत्यक्ष जीवनात काम करताना कितीही बिकट व आणीबाणीचा प्रसंग आला, तरी त्या वेळीही जाणवत राहतं, हा प्रसंग, ही माणसं यातून कथानक सचतंय... मग कधी तरी त्याची कथा होते, अनेकदा ते कथाबीज लेखनासाठी योग्य नाही असं वाटतं. मग ते मी सोडून देतो. काही दिवसांनी त्या कथाबीजात वेगळी भर पडून नव्या स्वरूपात लेखन वा कथा जन्मते.

३१० । लक्षदीप