पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/308

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अभ्यास करून लिहिलेल्या लेखनाकडे वाचक ब-यापैकी आकृष्ट होत आहेत.
 माझे लेखन अशा चोखंदळ व चाकोरीबाहेरचं वाचणा-यांसाठी आहे. अर्थात् हे। मी ठरवून करीत नाही. मुळातच मला चाकोरीतलं व हलकंफुलकं सुचत नाही. माझं वाचन अक्षरशः स्वैर व विविधांगी आहे. वाचताना मनोमन ‘व्हिज्युअलायझेशन' करायची सवय स्वभावत: आहे; त्यामुळे मला जरा हटके’ सुचतं, असं फार तर म्हणता येईल.
 पण वाचकहो, येथे मला माझ्या वाचनाबद्दल आणि लेखक म्हणून माझ्या भूमिकेबद्दल बोलायचं आहे.
 प्रथम वाचन व्यासंगाबद्दल : लेखक हा मूलत: चौफेर वाचक असावा लागतो, अशी माझी धारणा आहे. वाचनातून जे जीवनदर्शन घडत जातं, त्यामुळे इतरांना समजून घेण्याची जिज्ञासा तृप्त होत जाते. माणसाला स्वभावत: इतरांच्या जीवनात डोकावून पाहायला आवडत असतं. नातलग, मित्रमंडळी आणि व्यावसायिक संबंधांमुळे आपण अनेकांशी जोडले जातो. त्या सर्वांचं जीवन आपल्या नजरेसमोरून ब-यापैकी उलगडत जात असतं. पण त्यामुळे त्यांना त्यांच्या पूर्व अंतरंगांसह जाणता येतंच असं नाही. ललित लेखनातून त्याचा निर्माणकर्ता म्हणजे लेखक आपला अनुभव, प्रतिभा आणि व्यासंगाद्वारे त्या माणसांना अंतर्बाह्य स्वरूपात वाचकांपुढे पेश करतो, तेव्हा मात्र नवीन जीवन प्रत्ययास येतं आणि मग इतरांना समजून घेण्याची व जाणण्याची लेखकाची स्वाभाविक जिज्ञासा तृप्त होते. त्यातून जीवनाकडे पाहण्याची त्याची दृष्टी समद्ध व सखोल होत जाते. ललित गद्य-पद्य लेखनासाठी लेखक / कवीला कथाबीज किंवा काव्यकल्पना सुचणं यासाठी प्रतिभा लागते, पण तिचं साहित्यकृतीत रूपांतर करताना तेवढे पुरेसं नसतं. जो जीवनानुभव वा जीवनदर्शन वाचकाला द्यायचं आहे, ते समाजापासून वेगळे किंवा समाजाशी नाळ तोडलेलं कधीच नसतं. माणसाचं वर्तन, त्याच्या क्रिया-प्रतिक्रिया, तो ज्या समाजाचा घटक असतो त्या समाजाचा इतिहास, संस्कृती व परंपरा यांचा आविष्कार असतो. तो जाणल्याविना, अभ्यासल्याविना केलेलं लेखन समृद्ध व सखोल होत नाही.
 जे लेखक हे सारे सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ अभ्यास व चिंतन - मननाद्वारे जाणून घेऊन लेखन करतात, त्यांचं लेखन वाचकांच्या जाणिवेच्या व आकलनाच्या कक्षा रुंदावतं आणि त्यांना एक सकस जीवनानुभव देऊन जातं. मी स्वत:ला या प्रकारचा लेखक समजतो, किमानपक्षी माझा त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न असतो.

 'कष्णार्पण वस्तु', ही कथा एक ‘फॅन्ट्सी ' स्वरूपाची अद्भुतरम्य कथा आहे. स्त्री ही पुरुषावर निखळ व सर्वस्वानं प्रेम करते. पुरुष मात्र हिशोबी व सावध प्रेम करतो. या सनातन मानवी प्रवृत्तीवर मला त्या कथेतून भाष्य करायचं होतं. त्यासाठी भारतीय परंपरेतल्या सावित्री-सत्यवान कथेशी समांतर, पण विरोधी कथानक मी रचलं. त्यात

३०८ लक्षदीप