पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/304

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पण तरीही अशा विपरीत काळातही अंत:प्रेरणेने व ध्येयवादाने झपाटलेले बरेच अधिकारी व कर्मचारी (खास करून जि. प. शाळेत कुणाचाही पाठिंबा नसलेले, उलटपक्षी विपरीत परिस्थितीत असलेले बरेच शिक्षक) काम करीत आहेत. देश व समाजविकासात आपला खारीचा वाटा निष्ठेने उचलत आहेत, त्यांच्यासाठी प्रशासनाचा ‘स्वधर्म पाळत चालणं अग्निपथावरून चालण्यासारखंच आहे.
 प्रशासनाचा 'स्वधर्म’ कोणता? अंगीकृत काम चोखपणे बजावणं, ही सर्वमान्य व्याख्या झाली. पण भारतात कल्याणकारी राज्यव्यवस्था आहे. म्हणून तळागाळातल्या माणसांच्या विकासासाठी ध्येयधोरण राबवणं हा प्रशासकाचा ‘स्वधर्म आहे. या स्वभावधर्माला जागताना कल्पकता, प्रामाणिकपणा, ‘पोलिटिकल बॉसेस' ना प्रसंगी 'नाही' म्हणण्याची हिंमत आणि तळागाळातल्या माणसांचं दु:ख जाणणारी संवेदनशीलता हवी.
 मी वेळोवेळी अग्निपथावरून चालताना पाय पोळून घेतले आहेत. चांगुलपणावरचा विश्वास उडावा, असे अनेक कसोटीचे प्रसंग माझ्या वाट्याला आले आहेत. पण स्वत:वरचा विश्वास, आपण काही गैर केलं नाही याची सार्थ जाणीव आणि ‘अच्छे के साथ (देर से सही, तकलीफ हो सही पर) हमेशा अच्छा होता है' यावरची डोळस श्रद्धा मला सिनिक होऊन देत नाही किंवा सुरक्षित कवचात स्वत:ला आक्रसून घेत केवळ ‘नोकरी एके नोकरी करू देत नाही.
 दोन वर्षांपूर्वी ‘अग्निपथ' नावाची कथा मी ‘सत्याग्रहीं विचारधारा' च्या दिवाळी अंकात लिहिली होती. म.न.पा. आयुक्त म्हणून काम करताना आलेल्या स्वानुभवावर ती होती. शहराची प्रमुख नागरी समस्या म्हणजे रस्ते, ते पक्के बांधण्यासाठी पुरेसा निधी नव्हता. म्हणून, बांधा - अर्थसाहाय्य करा - हस्तांतरित करा' (बिल्ड, फायनान्स अँड ट्रान्स्फर) या नव्या पद्धतीनं महाराष्ट्रात प्रथमच काँक्रीटचे १६ प्रमुख रस्ते बांधताना मला ज्या अडीअडचणींना तोंड द्यावं लागलं. (त्यावर खरं तर कादंबरीच होऊ शकेल) त्याचा एक पैलू या कथेत साकारला होता. हा त्रास व अडथळा राजकारणातून होत होता. मी स्वत: भ्रष्टाचार केला नाही व इतरांना करू दिला नाही, म्हणून होत होता. पक्षीय राजकारणाचाही त्याला मोठा पदर होता. तथाकथित ब्लॅकमेलर' कम समाजसेवक, जिल्हास्तरीय मीडिया, नगरसेवकांपासून वरच्या स्तराचे राजकीय प्रतिनिधी आणि माझ्याच म. न. पा. चे काही कर्मचारी अधिकारी या सा-यांशी मुकाबला करताना मला विपरीत अनुभव आले. त्या वेळी प्रशासकीय स्वधर्मावरील अढळ निष्ठेमुळेच मी अविचल राहिलो. तरीही प्रचंड त्रास झाला. दोन नौकशी झाली. प्रत्येक वेळी ‘क्लीनचीट' मिळाली, पण त्याची मोठी किंमत द्यावी लागली.

 देशाचे पंतप्रधान म्हणतात, अधिका-यांनी निर्भयपणे काम केले पाहिजे. धाडसी

३०४ व लक्षदीप