पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/294

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुत्र तुझी जी मूल्यं आहेत, तुला घडविताना शिल्पकारानं जी स्वप्ने पाहिली होती, ती आता सत्यात साकारात आहे. कारण आज बराक हुसेन ओबामा हा तुझा तेजस्वी व ‘अशक्य ते शक्य करून दाखवणारा व तसा अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील सर्वच पीडित, वंचित समाजाला आशावाद देणारा पुत्र अमेरिकेचा ४४ वा राष्ट्राध्यक्ष बनला आहे.
 मला त्याच्यात व त्या माध्यमातून तुझ्या प्रतिमेत थोडा येशू ख्रिस्त दिसतो, थोडा पैगंबर भेटतो व खूप काही गौतम सापडतो. अब्राहम लिंकन, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला आणि मार्टीन ल्युथर किंगचा थोडा थोडा भास होतो. नाहीं भगवते, नाही, हा माझ्या मनाचा खेळ नाही. ज्याचे वडील केनियाचे मुस्लीम आहेत, माता अमेरिकेची श्वेतवर्णीय ख्रिश्चन आहे व जो इंडोनेशियात वाढला, तो केवळ अमेरिकेतच सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो. कारण त्या देशावर तुझी कृपादृष्टी आहे. एक भारतीय म्हणून हेवा वाटावा, पण वाटत नाही. कारण आमची कल्पना चावला, आमची सुनिता विल्यम्सला तुम्हीच आपलं करीत अंतराळी विहार करण्याची प्रेरणा दिलीत की, उद्याच्या, पुढच्या निवडणुकीत भारतवंशीय बॉबी जिंदाल रिपब्लिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार असेल अशी आतापासूनच तुझ्या देशात चर्चा सुरू झाली आहे ना? हा तुझा व तुझ्या देशाचा मोठेपणा आहे. कारण सारं जग तुझ्या देशात सामावलेलं आहे.
 पण एक कळकळीचं मागणं आहे, हे अमेरिकेचे स्वातंत्र्य देवते, तुझ्या पायी. आजही तुझी अमेरिका जगात हुकूमशाहीला का साथ देते? का प्रचंड प्रमाणात शस्त्र, दारूगोळा व भयंकर विध्वंसकारी शस्त्रांची जगभर निर्यात करते? का विकृत उपभोगवाद व अतिरिक्त हाव आणि स्वार्थाची दीक्षा जगभरातील माणसांना श्रेष्ठ अमेरिकेन संस्कृतीच्या नावानं देते? हे - हे तुला पसंत आहे?
 नाही ना? मग तुझ्या अमेरिकन बालकांना सुबुद्धी दे. आज एक ओबामा आहे. उद्या हजार होऊ देत. तरच जगात शांतता नांदेल व समृद्धी, सुखशांती येईल!
 हे - हे तुझंही स्वप्न आहे ना?
 तुझ्यावर शेकडो कवींनी गीतं रचली आहेत, गाणी गायली आहोत. तुझ्या उभारणीच्या वेळी चौथ-याच्या कामासाठी निधी संकलित करण्यसाठी इमा लाझारस हिनं तुझ्याबद्दल किती ठामपणे म्हटलं होतं की, तू मूकपणे गात आहेस.
 "Give me your tired , your poor,
 Your Huddled masses yearning to breathe free
 I lift my lamp beside the golden door..

 तुझ्या आणखी एका लेकराचं हे कवन पहा..."

२९४ लक्षदीप