पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/285

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बधिर झाली होती. ती त्यांचं गूज ऐकेनाशी झाली होती. ती थंडर’ जगता- प्रती मूकबधिर झाली हेती. त्या काळातली ही कहाणी आहे. जेव्हा माणसांनी शेवटची ‘थंडर' वाणी ऐकली होती."
 गाईडची कथनशैली मोठी रसाळ व रोचक होती. या प्रस्तावनेनंतर त्यानं कहाणी सांगितली, ती अशी :
 कित्येक वर्षात माणसांनी ‘थंडर' जगताची वाणी ऐकली नव्हती, त्या काळात नायगरा गावातली एक तरुणी उन्हाळ्यातील एके दुपारी एका झाडाखाली झोपली होती. तेव्हा तिथून एक वृद्ध स्त्री जात होती. तिनं पाहिलं की, सापासारखं काहीतरी सरपटत त्या तरुणीच्या वस्त्रात शिरलं होतं. तरुणीला त्याचा पत्ताच नव्हता. कारण ती गाढ झोपेत होती.
 पण त्या वृद्ध स्त्रीनं त्याकडे दुर्लक्ष केलं. तरुणीला न उठवता, तिला काही न सांगता ती निघून गेली.
 काही वर्षांनी ती तरुणी विवाहबद्ध झाली. पण काही दिवसात तिचा नवरा अचानक वारला. तिनं त्यानंतर दोनदा विवाह केला, पण संसारसुख तिच्या नशिबात नसावं, दोन्ही नवरे लग्नानंतर काही दिवसातच अचानकपणे मृत्युमुखी पडले.
 ती तरुणी घाबरली होती. काय करावं अन् काय करू नये याचा तिला बोध होत नव्हता! ती वृद्ध स्त्री तिला काय घडलं ते सांगून मदत करू शकली असती. कारण त्या सर्पासारख्या सरपटणाच्या प्राण्यामुळे ती तरुणी विषकन्या बनली होती. तिच्याशी संग होताच तिचे तिन्ही नवरे मृत्युमुखी पडले होते, पण तिला त्याची खबर नव्हती. त्या वृद्ध स्त्रीचं वर्तन हेच सांगत होत की, माणसं स्वार्थी आणि अविश्वासू बनली होती!
 त्या तरुणीनं निराश होऊन स्वत:चा शेवट करायचं ठरवलं. तिनं नायगरा धबधब्यावरून उडी मारून प्राण द्यायचं ठरवून एके दिवशी उडी मारली, पण धबधब्याच्या पाण्यावरून खाली फेकली जाताना तिला जाणीव झाली की, ती हळुवार गतीनं धबधब्याच्या पायथ्याशी जात होती. जणू कुणीतरी तिला पकडून तिची गती मंद करीत होतं. कुणीतरी तिला धबधब्याच्या पाण्याच्या मागे ओढून घेतलं, अंधारामुळे कोण ते तिला कळतं नव्हतं.

 काही वेळानं त्या अंधारात तिला दिसू लागलं. ती एका अंधाच्या गुहेत होती व सभोवती अनेक माणसं होती, ती सारी ‘थंडर' जमातीची होती. त्यांनी तिला सांगितलं की, ते अदृश्य असतात. केवळ धबधब्याच्या मागे प्रकट होतात व इतरांना दिसतात. त्यांनी तिला तिच्या आत्महत्येच्याबाबत विचारलं, तेव्हा तिनं आपली करुण कहाणी सांगितली. तेव्हा एक 'थंडर' माणूस हसून म्हणाला,

लक्षदीप २८५