पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/279

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गेल्या, त्यापैकी काही कविता काल मी इंटरनेटवर यासाठी खास तयार केलेल्या Www.niagarapoetry.com या संकेतस्थळावर वाचल्या होत्या व ज्या आवडल्या त्याची प्रिंट काढली होती, ते कागद माझ्या हातात होते व मी अंजूला - माझ्या पत्नीला व मित्राला वाचून दाखवत होतो... आणि मनानं नायगरा नजरेसमोर आणायचा प्रयत्न करीत होतो. त्यात एक वेगळेच काव्यात्मक समाधान मिळत होते.
 Splendour Supreme of Constant majesty
 Of towering passion, Overpowering charm,
 At last mine eyes behold thee as than art.
 In all the lightness of thy moving & grace;
 In all the whiteness of thy soaring spray;
 In all the brightness of the might!
 आधी बफेलो शहर, मग नायगरा शहरामधून कार जेव्हा एक दिमाखदार वळण घेऊन धावू लागली, तेव्हा अंजूनं बोट दाखवीत म्हटलं, "ते काय आहे? वर आकाशात जाणारं धुकं, का दुसरं काही?"
 मीही पाहू लागलो. समोर दोन तीनशे मीटर अंतरावर आकाशात धुक्याचे लोट जात होते. पण आजुबाजूला तर साफ होतं, हे धुकं नाही खचितच्.
 “यू आर राइट!” मित्रानं खुलासा केला, “नायगरा धबधबा खाली वेगानं पडल्यावर जे पाण्याचे तुषारकण उठतात, ते आहेत. धुकं नाही..."
 ओ माय गॉड! एवढ्या उंच आसमंतात पाण्याचे धुक्यासारखे वाटणारे दाट तुषारकण! कसा असेल नायगरा? मनाची अधीरता आता टिपेला पोहोचली होती.
 गाडी पार्क करून सुमारे पंधरा मिनिटं चालल्यावर एकदम नायगरा धबधब्याचा थोडासा भाग दिसला. हिरव्या रंगाची झाक असलेलं पाणी शुभ्रधवल होत वेगानं खाली पडताना दिसत होतं. आणि ते थंड तुषारकण तोंडावर आले आणि किंचितशी हुडहुडी भरवून गेले...
 आम्ही आता नायगरा नदीच्या अगदी जवळ होतो आणि आधी संथ असणारं पाणी वेग धारण करीत कड्याच्या टोकावरून वेगानं पडत होतं. आणि त्या प्रपाताचा धीरगंभीर, एकाच टिपेतला - खर्जातला म्हणता येईल असा गच्च दमदार आवाज संगीत लहरीप्रमाणे कानात रुंजी घालू लागला...
 आज नायगरा पाहायला येणा-या पर्यटकांची गर्दी जास्तच वाटत होती. पण लोखंडी कठड्याला रेलून मी भान हरपून तो निसर्गाचा अद्भुत नजारा अधाशाप्रमाणे पाहात होतो!

 मी भानावर आलो ते मित्राच्या हाकेनं. त्यानं एक गाईड पाहिला होता, जो

लक्षदीप । २७९