पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/276

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ही एक छान जागा होती... बागेतील एका पाटीनं माझं लक्ष वेधून घेतलं. तो एक पर्यावरणवाद्यांसाठी व एकूणच माणूसजातीसाठी छान असा संदेश होता.
 "A man does not plant trees for himself. He plants if for posterity."
 आता परतीची वेळ झाली होती, पण आज आम्हांला पाऊस चकवा देणार असंच दिसत होतं! रवींद्रनाथ टागोरांप्रमाणे आम्ही येथे पावसाबाबत कमनशिबी ठरणार होतो.
 मनात मागच्या आय. ए. एस. ऑफिसरचा जो ग्रुप पावसामुळे इतर काही न पाहता परत फिरला होता, त्यातील माझ्या एका सन्मित्राचे वाक्य पुन्हा पुन्हा आठवत होतं.
 "काय तुफान पाऊस होता म्हणून सांगू! संतत धरलेली धार म्हणजे पाण्याचा आकाशातून जमिनीपर्यंत सरळसोट निर्माण झालेला वृक्षच जणू... एवढा प्रचंड मुसळधार पाऊस होता. जगातलं सर्वात भिजणारं गाव हा चेरापुंजीचा महिमा किती सार्थ आहे, हे त्यावेळी प्रत्ययास आलं...!”
 दार्जिलिंगला सात वेळा जाऊनहीं जसं गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांना कांचनगंगा शिखराचं हिमशुभ्र दर्शन झालं नाही, तसंच आज चेरापुंजीला येऊनही आम्हास पाऊस भेटलाच नाही. तो अंगावर घेण्याचे व रंध्रारंध्रात मुरवून घेण्याचं स्वप्न अधूरंच राहिलं.
 त्यासाठी मला पुन्हा चेरापुंजीला आलं पाहिजे. आणि हे सोरावगांवार - चेरापुंजीचं मूळ खासी नाव - तुझं आकर्षण मला तुझ्याकडे पुन्हा खेचून आणेलच. आणि ही शरणागती मला आवडणारी असेल.
 तोवर -

 ‘खूबलेई शिबून’ Khublei shibun - अर्थात् ‘बैंक्यू यू व्हेरी मच अँड गॉड ब्लेस यू वुईथ बाऊंटीफुली शॉवर्स!'

२७६ । लक्षदीप