पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. प्राचीन काळी एक महाकाय दैत्य माजला होता, तेव्हा त्याच्या त्रासापासून कशी सुटका करून घ्यावी, असा लोकांपुढे प्रश्न पडला. तेव्हा त्यांनी एक युक्ती योजली. त्या दैत्याला चांगल्या भोजनाचं आमिष दाखवलं. त्यातून त्याला लोखंडाचे अणकुचीदार तुकडे चारले, त्यामुळे आचके देत तो मरण पावला. त्याचा मृतदेह म्हणजे कोह रामहाहा हा दगडी सुळका होय!
 हा शंकू आकृती - बास्केटसारखा दिसणारा सुळका - सुमारे शंभर फूट उंचीचा असावा. त्यावरून त्या महाकाय दैत्याची कल्पना करता येते.
 इथे डोंगरराशी संपतात आणि खोल दरी व समतल भाग सुरू होतो. ही सध्याच्या बांगलादेशाची सीमा होय. एप्रिल महिन्यातही दूरवरून क्षितिजापर्यंत भिडलेलं पाणी दिसतं होतं. पावसाळ्यात सारा भूभाग जलमय होतो. उंचावरून खाली सुमारे चार हजार फूट खोलीवर असलेला क्षितिजापर्यंतचा जलमय झालेला भूभाग पाहताना मन थक्क होत होतं. बांगलादेशीय नागरिक दरवर्षीच पूर व वादळाला सामोरे जातात, त्याची इथून कल्पना येत होती.
 टळटळीत दुपारही टळू लागली होती. चारेक तासांच्या भटकंतीनंतर भूक जाणवत होती. जेटस्टार आम्हाला ‘ऑर्किड व्ह्यू' या हॉटेलमध्ये घेऊन गेला. आणि तेथे मेघालय पर्यटन विभागाच्या, माहिती पुस्तकात नसलेलं एक प्रेक्षणीय दृश्य पाहायला मिळालं. “सेव्हन सिस्टर फॉल'
 एका व्हॅलीपॉईंटवर हॉटेल ‘ऑर्किड व्ह्यू' आहे. त्यांच्या काटकोनात असलेल्या डोंगरातून खालच्या विस्तीर्ण दरीमध्ये सात छोटे छोटे धबधबे (वॉटर फॉल) पडताना दिसले आणि भान हरवलं. एका ओळींत, ठरावीक अंतरात वर-खाली उंचीवरून कोसळणारे शुभ्र उदकाचे ते धबधबे पाहताना डोळे निवत होते. त्याला मोठं समर्पक नावही त्यांनी दिलं - ‘सेव्हन सिस्टर्स फॉल', आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश या सात राज्यांना ‘सात बहिणी' (सेव्हन सिस्टर्स) म्हटलं जातं. त्यावरून या सात धबधब्यांना हे नाव दिलंय. आता उत्तर-पूर्व राज्यात १९७५ पासून सिक्कीमचा समावेश झालाय. गुवाहाटीला मराठी पत्रकार नितीन गोखलेनं असं म्हटलं होतं की, या सात बहिणींना आता एक छोटा भाऊ सिक्कीमच्या रूपानं लाभलाय. 'सेव्हन सिस्टर्स फॉल' महालात आठवी धबधबा दिसतोय का हे मी पाहात होतो. हा छोटा भाऊ रुसला, की सात बहिणींनी मिळून त्याला पिटाळलं? असा गमतीदार प्रश्न मनातं येत होता...

 यानंतर आम्ही पाहिला तो 'थंग खरंग' हा साडेपाच एकर पठारावरचा पार्क.. तिथे झाडे व दुर्मीळ वनस्पती होत्या. त्याला लागून खोल दरी होती व इथूनही बांगलादेश सीमा दिसत होती. निवांत - शांत जागा, प्रेमीजनांच्या कूजनासाठी आदर्श जागा. या बागेतून एक फेरफटका मारला. चेरापूंजीवासीयांसाठी सायंकाळी फिरण्यासाठी

लक्षदीप । २७५