पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/271

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेळ नाही लागत. केव्हाही पाऊस पडू शकतो."
 मी त्यावर एवढंच म्हणालो, “खूबलेई.." (गॉड ब्लेस यू)
 तो माझ्याकडे खासी अभिवादनामुळे सानंद आश्चर्यानं व आत्मीयतेनं पाहातच राहिला..
 चेरापुंजीचा पाच पन्नास - किलोमीटरचा टापू हा उघडा बोडका डोंगराळ टापू आहे. भरपूर पाऊस म्हणजे घनदाट जंगल, हिरवीं-कंच वृक्षराजी आणि गर्द हिरव्या हिरवळीची शाल पांघरलेल्या पर्वतराशी... असं समीकरण माझ्या मनात घट्ट बसलेलं होतं! सात भगिनी राज्यात व त्यांच्या सर्वात लहान, अलीकडेच भाऊ बनलेला सिक्कीम राज्यातही गंगटोक, कोहिमा, दार्जिलिंग आणि शिलाँग ही शहरं पाहिल्यानंतर हा अनुभव सतत येत होता. पण त्याला अपवाद ठरला चेरापुंजीचा परिसर.
 “त्याचं असं आहे सर, एकतर इथं लाईमस्टोन व कोळशाचे साठे भरपूर आहेत. आणि इतका धुवांधार पाऊस पडतो की, डोंगरदरीत, जमिनीत पाणी शिरतच नाही आणि त्यामुळे वृक्ष - झाडे मूळ धरू शकत नाहीत. इथे डोंगरावर छोटी छोटी झुडपं तेवढी दिसणार तुम्हाला." जेटस्टारचं स्पष्टीकरण पटण्यासारखं होतं.
 तरीही प्रेमात पडावं असंच गाव आहे चेरापुंजी, किंवा असं म्हणा ना, आख्खं मेघालय, एक स्त्री पूजक लेखक म्हणून मला इथल्या खासी, गोरा व पैतिश जमातीचा ख-या अर्थाने एक असणा-या स्त्रिया भावल्या. कामाच्या जागी, दुकानात वा डोंगरदरीत सर्वत्र काम करताना स्त्रिया दिसतात. बुटक्या, अटकर बांध्याच्या, बसक्या नाकाच्या, पण खास मराठी सौंदर्य घेऊन आलेल्या आणि मुख्य म्हणजे श्रमातल्या शृंगाराचं लेणं ल्यालेल्या!
 दिवसभर चेरापुंजी शहरातली पर्यटन स्थळे पाहताना, उभं आडवं शहर टॅक्सीनं पालथं घालत असताना इथं जाणवत होती ती स्त्री सत्ता. कारण इथल्या तिन्ही आदिवासी जमातींमध्ये मातृसत्ताक कुटुंबपद्धती आहे, इथली माणसं आईच्या नावानं ओळखली जातात व मालमत्ता आईकडून सर्वात धाकट्या मुलीकडे जाते व ती सान्यांचा सांभाळ करते. लग्नानंतर मुलं मुलीच्या घरी राहायला जातात. केरळमध्ये नायर जमातीमध्येही ही प्रथा सतराव्या - अठराव्या शतकापर्यंत चालू होती. ती आता जवळपास संपुष्टात आली आहे. पण इथं स्त्री-शक्तीचं दर्शन घरोघरी घडत होतं!

 आम्ही सर्वात प्रथम पाहिला तो 'नोह कलीकाई” धबधबा किंवा फॉल, तो कलीकाई नामक स्त्रीच्या नावे ओळखला जातो. चेरापुंजीपासून चार किलोमीटर अंतरावरचा हा ‘फॉल' पाहणं ही एक दुर्मीळ समाधानाचा अनुभव आहे. पर्यटन विभागानं हा 'फॉल' पाहण्यासाठी एक सुरेख पॉईंट विकसित केला आहे. डोंगराच्या कडेला सुळक्यावर उभं राहून समोर अथांग पसरलेल्या खोल दरीत काटकोनातल्या डोगरावरून प्रचंड वेगानं शुभ्र नितळ पाण्याचे लोट धबधब्याचं रूप धारण करीत

लक्षदीप । २७१