पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/270

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जगणं. आय होप, यू विल एंजॉय, चेरापुंजी बाय, अॅन ऑल टुगेदर डिफरंट एक्सपिरिअन्स."
 आमच्या सोबतीला वाटाड्या होता. शिलाँग शहर ज्या इस्ट खासी हिल डिस्ट्रिक्ट मुख्यालय आहे, त्या जिल्ह्याच्या कलेक्टर कचेरीमधला अन्न व नागरी पुरवठा विभागाचा सब-इन्स्पेक्टर जेटस्टार वारजी... खांसी जमातीचा, ख्रिश्चन, पन्नाशीच्या पुढेच असावा, पण उत्साही आणि बोलका. आमचे संभाषण झालं ते इंग्रजीतून. कारण मेघालयाची अधिकृत शासकीय भाषा इंग्रजीच आहे. आणि इथं बहुसंख्य ख्रिश्चन झालेले तरीही अंतर्बाह्य खासी गारो किंवा जेतीया या भूमिपुत्री आदिवासी जमातीचे.
 “सर, दोन दिवसापूर्वीच चेरापुंजीला तुफान पाऊस झाला. त्यामुळे तुमच्या दुस-या आय. ए. एस. अधिका-यांच्या ग्रुपला मी घेऊन आलो होतो. त्यांना काही पाहता आलं नाही. पण आज वातावरण स्वच्छ आहे. तुम्हाला धबधबा, गुंफा व पार्क पाहायला नक्कीच मिळतील. डोंट वरी!"
 “आम्हाला ते सारं पाहायचं तर आहेच, पण इथला पाऊसही अनुभवायचा आहे."
 “सर - तुम्ही टूरिस्ट म्हणून बोलत आहात. जेव्हा सलग तुफान पाऊस पडतो, दिवस दिवस बाहेर पडता येत नाही. तेव्हा पाऊस हा भयप्रद व प्रलयकारी वाटतो. मी इथं तीन वर्षे गोडाऊन कीपर होतो. मी पावसाचं भयंकर रूप पाहिलंय.... आम्हाला त्याचं तुमच्याप्रमाणे टूरिस्ट म्हणून अॅटॅक्शन नाहीये."
 जेटस्टार आमच्या उचंबळून येणा-या उत्साहावर विरजण टाकीत होता. क्षणभर मला त्याचा रागही आला. पण मग मनात विचार आला. दोन दिवसांसाठी प्रवासी म्हणून येणार, चेरापुंजीला ठीक आहे. पण जेव्हा पंधराशे- सोळाशे मिलीमीटर पाऊस अवघ्या चोवीस तासात पडतो, तेव्हा काय होत असेल इथल्या जनजीवनाचं? महाराष्ट्रात मी ज्या महसूल विभागात अनेक वर्ष काम केलं, तिथे चोवीस तासात जर ६५ मि. मी. पेक्षा जास्त पाऊस पडला, तर पूर परिस्थिती निर्माण होते, असं अधिकृत मानलं जातं. इथं त्याच्या दहापट पाऊस एका दिवसात अनेकवार पडतो. एप्रिल ते सप्टेंबर - ऑक्टोबरपर्यंत दरमहा ७०० ते ८०० मि. मी. पाऊस सरासरीने चेरापुंजीवर कोसळतो असं इंडिया मटिरॉलॉजिकल ऑब्जव्हेटर्स चेरापुंजी व अधिकृत माहितीपत्रक सांगतं. त्यामुळे जेटस्टार जे म्हणतोय, ती वस्तुस्थिती आहे.
 पण तरीही मनातली चेरापुंजीबाबतची रोमँटिक कल्पना एवढ्या सहजासहजी कमी होणं शक्य नव्हतं!

 आमची टॅक्सी जेव्हा चेरापुंजीला पोहोचली, तेव्हा सकाळचे अकरा वाजून गेले होते. ब-यापैकी ऊन जाणवत होतं! “पण यावर जाऊ नका सर, इथं मोसम बदलायला

२७० । लक्षदीप