पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कार्नाड यांच्या एकूण नाट्यक्षेत्रातील कामगिरीचे त्यांनी तीन सूत्रांमध्ये दिग्दर्शन केले आहे.त्यांच्या नाटकातील आशयसूत्रे व विकासक्रम यांचा तीन टप्प्यांमध्ये विचार केला आहे.पुराणकथांचा नवा अन्वयार्थ मांडणारी नाटके,ऐतिहासिक नाटकातून उलगडणारे आजचे वास्तव आणि एकविसाव्या शतकातील आजच्या काळाची नाटके- या तीन परिप्रेक्ष्यातून कार्नाडांच्या नाटकांचे आकलन मांडले आहे.'ययाति'पासून ते ‘उणे पुरे एक शहर' या नाटकांबद्दलचे हे विवेचन आहे.नाट्यवाचनाची सूक्ष्म स्वरूपाची रीत त्यांनी इथे अवलंबिली आहे.या नाटकांबद्दलच्या काही नवे अन्वयार्थाचेही त्यांनी सूचन केले आहे.कर्नाडांच्या नाटकातील विविधस्वरूपी आशयसूत्रे,नाटककार म्हणून कर्नाडांनी पुराणकथांचा, इतिहासाचा व समकालीन वास्तवाचा लावलेला अन्वयार्थ देशमुखांनी नोंदविला आहे.
 'परफेक्ट शॉट विरुद्ध इनपरफेक्ट लाईफ' या लेखात त्यांनी गुरुदत्तचा जीवनालेख मांडला आहे.गुरुदत्तच्या जीवनाविषयी व अखेरच्या काळाविषयी लोकांना एकप्रकारचे कुतूहल आहे.या कुतूहलापोटी अनेकांनी या विषयावर लिहिले आहे.देशमुख त्यांनी या लेखात गुरुदत्तच्या असफल शोकान्त जीवनाचा वेध घेतला आहे.द्वंद्वात कातरत गेलेला कलावंत असे त्यांनी त्याचे वर्णन केले आहे.गुरुदत्तच्या चित्रपट कारकीर्दीतील व खाजगी आयुष्यातील घटना समोर ठेवून त्याचा अन्वयार्थ लावला आहे. कलावंताच्या प्रेमाचा पेच तो सोडवू शकला नाही.अखेरीस तो मद्य व झोपेच्या गोळ्यांनी मरणाला सामोरा गेला.या त्याच्या शोकात्म आयुष्याचा पट उलगडण्याचा प्रयत्न देशमुखाना केला आहे.
 ‘मला प्रभावित करून गेलेला सिनेमा' या साधना साप्ताहिकाच्या विशेषांकात देशमुख यांनी 'धग' या चित्रपटाचा सामाजिक समस्याप्रधान चित्रपट म्हणून त्याच्या मनावर जो ठसा उमटला तो या लेखात नोंदविला आहे.स्मशानात काम करणाच्या एका कुटुंबाची कथा 'धग'मध्ये आहे.उपजातीतल्या विषम भेदांची तीव्रतर जाणीव त्यामध्ये आहे.राष्ट्रपती पारितोषिकाने हा चित्रपट गौरविण्यात आला आहे. 'धग ने का प्रभावित केले याची ते तीन कारणे सांगतात.अस्सल देशी सकस पटकथा,दिग्दर्शकान मांडलेला जळजळता अनुभव आणि कलावंतांचा प्रभावी अभिनय.यात त्यांनी या चित्रपटाच्या प्रभावाच्या खुणा शोधल्या आहेत.भारतातल्या एका गंभीर सामाजिक प्रश्नाच्या मांडणीमुळे तो त्यांना भावला.मानवी जगणं व दु:ख याचे अनेक पैलू तीमधून चित्रित झाले आहेत.मनोरंजनप्रधान भारतीय चित्रपटापेक्षा सामाजिक व विचारप्रधान चित्रपटाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे.

१२.

 एकंदरीत देशमुख यांच्या वाङ्मयीन कामगिरीचे स्वरूप वरीलप्रमाणे आहे.

लक्षदीप ॥ २५