पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दृष्टिकोण हा एकरंगी स्वरूपाचा आहे.त्या प्रशासनाचा सकारात्मक चेहराही या लेखनातून प्रकट झालेला आहे.प्रशिक्षण कालावधीतील राजांसारखे कर्तव्यनिष्ठ अधिकारी व वारकरी सहकारी अधिकारी यांच्या नैतिकतेच्या धाकाचे विवरण त्यामध्ये आहे.देशमुख यांच्या या ललित लेखनातून आणखी एका अंगाकडे लक्ष वेधले आहे,ते म्हणजे प्रशासनातील विषम उतरंडीकडे.प्रशासनातील भेदाची बाजूही त्यांनी सांगितली आहे.वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी यांच्यातले संबंध हे श्रेष्ठ कनिष्ठत्वाचे असतात.विशेषत: प्रशासनातही स्त्री कर्मचा-यांकडे दुय्यमत्त्वाने,कनिष्ठत्त्वाने पाहिले जाते.
 ‘बखर भारतीय प्रशासनाची' या ग्रंथात देशमुख यांचे भारतीयल प्रशासनावर आधारलेले लेखन आहे.भारतीय प्रशासनाचा पूर्वोत्तर वारसा ते समकालीन भारतीय प्रशासनव्यवस्था यावरचे विवरण आहे. क्रमश: प्रशासनव्यवस्थेत होत आलेले स्थित्यंतर,त्यातील गुंते,सामर्थ्य व तिसरा स्तंभ म्हणून तिने बजावलेली भूमिका यांचे दर्शन आहे.एका सनदी अधिका-याने प्रशासन व्यवस्थेकडे आतून पाहिलेले हे चित्र आहे.त्यामुळे त्याची विश्वासार्हता वाढली आहे.
 एका ठिकाणी इनसायडर चंद्रकांतला म्हणतो,विवेकाची सुरी धारदार बनविली पाहिजे.आपण आपल्यापुरतं विकारी न होता विवेकी रहावं,वागावं या हेतूने प्रशासननामामधील लेखन घडलेलं आहे.

११.

 वैचारिक गद्य लेखनाबरोबरच देशमुखांच्या मन:पिंडात नाटक व चित्रपट या कलांविषयीची एक स्वतंत्र जागा आहे.या कलांचा ते सातत्याने विचार करीत आले आहेत.देशमुख यांनी नाटक व चित्रपट यांच्याविषयी काही लेखन केले आहे.त्यापैकी काही लेखांचा समावेश या ग्रंथात आहे.त्यांनी काही चित्रपटाच्या पटकथाही लिहिल्या आहेत.त्यांच्या काही कथांवर आधारित चित्रपटनिर्मिती होते आहे.नाटक व चित्रपट हे देशमुख यांच्या विचारविश्वाचा,आस्थेचा भाग आहे.वेळोवेळी त्यांनी या विषयावर लेखन केले आहे.त्यांच्या ललितलेखनातून या क्षेत्राशी विषय ध्वनित झाले.

 गिरीश कर्नाडांच्या भारतीय रंगभूमीवरील कामगिरीचा परामर्श घेणारा,गिरीश कर्नाड : भारतीय रंगभूचा एक जायंट' नावाचा दीर्घ लेख या संग्रहात आहे.जवळपास अर्धशतकभर भारतीय रंगभूमीवर वैशिष्ट्यपूर्ण नाटके लिहिणाच्या नाटककाराच्या सामर्थ्यस्थानाचा व वेगळेपणाचा विचार या लेखात आहे. गिरीश कार्नाडांवरील पुण्यातील तीन दिवसाच्या महोत्सवावरून त्यांना उपरोक्त विचार सुचले.कार्नाडांनी एकूण तेरा नाटके लिहिली.ती भारतभर प्रसारित झाली.देशमुख यांनी कार्नाड यांच्या नाटकाच्या वाङ्मयीन गुणवत्ता व प्रयोगरूपाबद्दलचे काही विचार मांडले आहेत.

२४ । लक्षदीप