पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पुन्हा आम्हांला चाहूल लागली होती. यावेळी मला मुलगी हवी होती. खंत एकच होती, मी जर अमितची बहीण असतो तर माझी मुलगी त्याला मोठी झाल्यावर देऊन त्याला जावई करून घेतला असता - केलेल्या स्त्रीभ्रूण हत्येचं पातक म्हणून. पण तो माझा भाऊ होता. त्यानं आपलं मरण हातानं ओढवून घेतलं होतं. ते पाप त्याच्या बरोबर माझं होतं - गेल्या वीस वर्षात ज्यांनी मुलीचा गर्भ मारला त्यांचं होतं!

तीन
२०३१ किंवा नंतरचं दशकः गे वर-वर सूचक मेळावा.

 रेशीमगाठी कार्यालयासमोर सुमारे पन्नासच्या वर वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाची तोबा गर्दी झाली होती! प्रवेशद्वारावर खाजगी सुरक्षा दलाचे आठ-दहा जवान तैनात होते. त्यांनाही प्रसार माध्यमांना आवरताना नाकी नऊ येत होते. ते पुन्हा पुन्हा सांगत होते, “साहेबांचा हुकूमं आहे - नो मीडिया. तुम्ही जा इथून. हा सारा खाजगी समारंभ आहे." प्रसारमाध्यमांना ते माहीत होतं, तरीही कळलेली बातमी एवढी खळबळजनक होती की, ब्रेकिंग व सर्वात प्रथम बातमी आपल्या चॅनेलवर यावी म्हणून इलेक्ट्रॉनिक मीडियाची धडपड चालली होती. फेसबुकवर रेशीमगाठी'नं चक्क एक साईट ओपन केली होती आणि तिला प्रचंड प्रतिसाद मिळत होता. काल रात्रीपासून कार्यालय उघडं होतं. हेतू हा होता की, ज्यांना आपली ही आयडेंटीटी लपवायची हाती, त्यांनी सान्या समाजाच्या नजरा चुकवून आधी यावं. काही जण तर चक्क बुरखा पांघरून आले होते. काही पठाणी सूट घालून पण चेहरा झाकून आले होते, काही धीट उघडपणे येत होते. प्रसार माध्यमांना फेसबुकवरून ही ब्रेकिंग न्यूज कळली होती. आणि त्यांच्या गर्दीमुळे रस्त्यावरून जाणा-या लोकांना. मग काय, एकाकडून दुस-याला. अशा गुणाकार पद्धतीनं ती काही क्षणात शहरभर पसरली. पोलिसांनाही ती समजली. लगेच एक सबइन्स्पेक्टर दहा-वीस पोलीस घेऊन तिथं बंदोबस्ताला आले.
 सनातनी, धर्म-संस्कृती रक्षक संघटना व पक्षांनाही बातमी कळताच भलतंच स्फरण चढलं. तेही लगबगीनं निषेधाचे फलक घेऊन 'रेशीमगाठी'च्या कार्यालयासमोर जमा झाले व घोषणा देऊ लागले.
 “धिक्कार असो. धिक्कार असो."
 "देगावकर हाय हाय!”
 "वधूवर सूचक मंडळ की विकृती केंद्र?”

 तेव्हा तिथं कारमधून नुकताच ज्यांचा शहरात एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून अमृत महोत्सवी वर्षाचं निमित्त साधून जाहीर नागरी सत्कार केला होता, ते उत्तम देगावकर उतरले. ताठ शरीरयष्टी पण पूर्ण पांढरे केस व तशीच दाढी - पहाताक्षणी ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व वाटावं. सत्कार समारंभात तसा आदरानं उल्लेख

२३० । लक्षदीप