पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देवबंद येथे तीनेक दिवस त्यांचे वास्तव्य घडले.या काळात त्यांनी देवबंद येथील पूर्व आशियातील सर्वात मोठ्या मदरशाला भेट दिली.त्या भेटीचा वृत्तांत या लेखात आहे.दरवर्षी ७००० पेक्षा जास्त विद्यार्थी इस्लाम धर्मशास्त्र शिक्षणासाठी या मदरशात येतात.पारंपरिक धर्माचे शिक्षण या मदरशात दिले जाते.भारत व भारताबाहेरील अनेक मशिदीमधील अनेक मौलवी व उलेमा या मदरशातून प्रशिक्षित झालेले आहेत.या मदरशाची कार्यपद्धती व व्यवस्थापन त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे व त्या निमित्ताने आपल्या मनातले विचार सांगितले आहेत.या मशिदीतील दिनक्रम व पारंपरिक शिक्षणाबद्दल लेखकाच्या मनात उद्भवलेले प्रश्नही त्यांनी मांडले आहेत.काही प्रमाणात नवे होत असलेले बदलही नोंदविले आहेत.मदरशातील पारंपरिक शिक्षण व आधुनिकीकरणाने जे पेच निर्माण झाले आहेत तो दृष्टिकोणही त्यांनी नोंदविला आहे.भारतातील एका मुस्लीम धर्मशिक्षणाचा,चळवळीचा ओघवता वेध या लेखात आहे.एका समाजाच्या धर्मशिक्षणाच्या स्थिती,कार्यपद्धती व त्यावरचे लेखकाचे चिंतन या लेखात आहे.

 काश्मीरियत : एक तत्त्वज्ञान,एक जीवनशैली या लेखात देशमुख यांनी एका राजकीय व सामाजिकदृष्ट्या संवेदनशील विषयाची मांडणी केली आहे.काश्मीरमधील एका प्रवासाच्या निमित्ताने या प्रदेशाविषयी त्यांच्या मनात जे विचार आले ते या लेखात मांडले आहेत.काश्मीरियतची संकल्पना इतिहास,संस्कृती व तत्त्वज्ञानाच्या आधारे त्यांनी मांडली आहे.काश्मीर लोकांची एतद्देशीय राष्ट्रवादी जाणीव सामाईक स्वरूपाचं भान आणि सांस्कृतिक मूल्यांची प्रखर जाणीव असलेली सहअस्तित्वाची जीवनशैली यात ते काश्मीरियतची संकल्पना पाहतात.काश्मीरियतच्या विकासक्रमात ज्या ऐतिहासिक घडामोडी घडल्या त्याचाही विचार ते करतात.ती सोळाव्या शतकापासून निर्माण झाली.त्याची पायाभरणी प्राचीन काळापासून होत आलेली आहे.देशभक्ती,बंधुभाव,देशीय संस्कृतीचा अभिमान व धार्मिक सहिष्णूता यातून काश्मीरी तत्त्वज्ञान व जीवनशैली निष्पन्न झाली.मुस्लिम राज्यकर्त्यांचा उदारमतवादी दृष्टिकोण आणि काश्मीरी भाषेतील तत्त्वज्ञान यातून ही संस्कृती आकाराला आली असे ते मानतात.काश्मीरमधील राजकीय,सामाजिक स्थित्यंतरे व सुफी परंपरेचा विस्ताराने निर्देश त्यांनी केला आहे.बाराव्या शतकातील संतकवयित्री लाल देड व नंद ऋषी यांच्या भक्तितत्त्वकवितेने काश्मीर जनभावनेचे भरणपोषण केल्याचे ते नोंदवतात.त्यांच्या वाङ्मयाचा परिचय करून देतात.मुस्लिम व पंडित यांच्यात असलेल्या कमालीच्या साम्यस्थळांचा ते निर्देश करतात.काश्मीरमधील भक्तिपरंपरा व जैनुद्दिन अनिदेन व सम्राट अकबराच्या सहिष्णू राजवटीने या संस्कृतीचा विकास केला.एकूणच आजच्या संवेदनशील प्रदेशाचा संस्कृतीचा विकास होऊन ती कशी आकाराला आली ते यो लेखात त्यांनी मांडले आहे.काश्मीरी भाषा व वाङ्मय याविषयीची सक्ष्म निरीक्षणे

२२ । लक्षदीप