पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मनानं पाहाण्याखेरीज आम्ही काय करू शकत होतो?
 एका मागून एक असे पाच नकार पचवताना खरंच जड जात होतं. मला संताप येत होता, तर हिचा चेहरा मलूल झाला होता. उसनं अवसान आणीत अमित शांत मुद्रेनं वावरत होता - पण त्याच्या आत किती तप्त उकळता ज्वालामुखी पेटला होता, हे मी जाणू शकत होतो!
 सहावी मुलगी आतापर्यंतच्या पाच मुलीच्या श्रेणीत चढत्या क्रमानं डावी होती. त्या वधू पक्ष मंडळीनाही दुपार होता होता कोणी भेटला नव्हता. त्यामुळे थोडी आशा वाटत होती. त्याच वेळी आणखी एक वरपक्ष तेथे आला. आणि जणू मुलीला स्वयंवराद्वारे अमित व त्या मुलामध्ये निवड करायची होती. तो मुलगा सरकारी नोकरीत होता व घरी जमीनजुमला होता. या दोन्ही बाबतीत अमितला तो निश्चितच वरचढ होता. वधू पक्षाचे प्रश्न, त्याला आमची व दुस-या वरपक्षाची उत्तरं आणि त्यावर वधूपक्षाचे प्रतिसाद. “शिक्षण बी. ए., बी. एस्सी., डी. बी. एम्. अगोबाई, याचं शिक्षण प्रोफेशनल आहे की!”
 दुसरा प्रश्न. दुसरी चौकशी. “नोकरी? पगार? खाजगी. दहा हजार; सरकारी. पर्मनंट. अठरा हजार!"
 "हे दुसरं स्थळ चांगलं आहे. तुम्ही या. योग नाही समजा. आणि तुमचं स्थळ आम्हांला पसंत आहे. आजच बोलणी करू या!"
 सहावा स्वच्छ नकार - तोही तुलना करीत. आता तेथे थांबणं शक्य नव्हत.
 बाहेर आल्यावर अमित म्हणाला, “तुम्ही जा घरी."
 "पण तुम्ही कुठे जाणार आहात भाऊजी?” हिनं काळजीनं विचारलं. "मला माहीत नाही." अमितचं तुटक उत्तर. त्याचा चेहरा आता स्वच्छ वाचता येत होता. कार्यालयात त्यानं ओढूनताणून आणलेलं चंद्रबळ आता ओसरलं होतं. त्याचा चेहरा निराशा, संताप व नकारानं विद्रूप - विकृत झाला होता जणू. मला त्याच्याकडे पाहावत नव्हतं. “तुम्ही जा. उगी माझ्याकडे बिच्चारा नजरेनं पाहू नका.” अमितचा आवाज फाटका चिरका झाला होता. “नकार - अपमानाची ही सिक्सर - मी मनानं घायाळ, जखमी झालोय दादा-वहिनी. पण मला कीव आवडत नाही - तमची पण. तेव्हा मला काही विचारू नका. मी कुठे जाणार आहे - काय करणार आहे, मला माहीत नाही."
 "अरे पण -" माझं वाक्य पूर्ण होण्यापूर्वी तो लांब लांब ढांगा टाकीत आमच्या नजरेआड झाला होता.

 “अरुणा-" मी वळून बायकोला म्हणालो, “हे माझं पाप आहे. मी तुला पहिल्या गर्भारपणी बळजोरीनं सोनोग्राफी करायला लावली व मुलीचा गर्भ म्हणून अबॉर्शन करायला लावलं, त्याची ही शिक्षा आपली कुलदेवता महालक्ष्मी आपणास देत आहे. मला माफ कर."

२२८ । लक्षदीप