पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वयंपाकाचे धडे घेतले, पण माझ्या वरताण ती छान पदार्थ करते. खास करून खरपूस सोनेरी रंगाची व योग्य सारण असलेली पुरणपोळी हा तिचा हातखंडा पदार्थ, मीही तिच्या हातची एक पोळी जादाच खाते व ढेकर देत तृप्तपणे म्हणते, “पोरी, पोटातून नव-याच्या आत शिरशील व त्याला प्रेमानं कायमचा गुलाम करशील!”
 पण - पण - पण - नीराला विसावं लागलं आणि ह्यांनी तिच्या लग्नाचं पाहायला सुरुवात केली. वाटलं होतं, कोणी तरी राजपुत्र तिच्या रूपागुणावर भाळून तिला सहज पसंत करेल. म्हणून आम्ही प्रथम डॉक्टर्स, अधिका-यांची स्थळं पहायला सुरुवात केली. आणि प्रथमग्रासे मक्षिकाप्रमाणे धक्के बसायला पहिल्या झूट प्रारंभ झाला. “गरीब भिक्षुकी घराणं असताना आमच्याकडे येताच कसे”, असे पुसले जाणारे रोकडे सवाल ह्यांना हवालदिल करून गेले. मलाही धक्काच बसला. वाटत होतं, मुलांना सुंदर, सद्गुणी मुलगी हवी असते. तिचं उत्पन्न महत्त्वाचं नसतं. पण भारतातल्या लग्नाच्या बाजाराचा नियम मी खरंच विसरले होते. इथे हुंडा द्यावा लागतो, तोही श्रीमंतांना चढत्या प्रमाणात. मुलीचं रूप-गुण हे नंतर पाहिलं जातं. हे हिशोबात फार पक्के. तुटपुंजं उत्पन्न असलं तरी दररोज १ नं पैचा हिशोब लिहून ठेवतात. ते नीराच्या प्रत्येक दाखवण्याची पण नोंद ठेवीत होते. एक दाखवणं म्हणजे पत्र व्यवहार, प्रत्यक्ष जाऊन भेटणं, फोटो-पत्रिकेच्या कॉप्यांचा खर्च आणि दाखवण्याच्या वेळी चहा-पोह्याचा खर्च. साधारणपणे सरासरीनं १९८५ ते ९० च्या दरम्यान एक दाखवण्याचा खर्च त्यांनी काढला होता - पाचशे रुपये. जेव्हा कांदापोह्यासह दाखवण्याचं अर्धशतक - हाफ सेंच्युरी झाली, तेव्हा हे सचिंत होत म्हणाले, “कसं व्हायचं आपल्या पोरीचं? वाटलं होतं, रूपागुणाची नक्षत्रासारखी पोर आहे. काटकसर करून लग्नखर्च व हुंड्याची बेगमी पण करून ठेवली आहे. पण मुलगी पाहाण्यापू बापाचं उत्पन्न पाहातात - हुंडा किती मिळेल या हिशोबानं. आणि मुलाला आपली नीरा पसंत पडली तरी नकार देतात."
 "खरं आहे. पण सतत नकारानं पोर मनानं खचून गेली आहे हो."
 "मला का दिसत नाही?" हे विचार करीत पुढे म्हणाले, “खरं सांगू, हल्ली मुलींचं प्रमाण जास्त आहे असं माझं निरीक्षण आहे. आपल्या नातेवाईकात बघ - मुली किती जादा आहेत. त्यामुळे मुलांना व त्यांच्या बापांना माज चढलाय. त्यांना वाटतं, राक नाही. छप्पन्न मुली झक मारत येतील. त्यांना निवडीची खूप संधी आहे -"
 आमचं विश्व छोटं असलं तरी त्यातले हे येणारे अनुभव पाहाता ह्यांच्या म्हणण्यात सत्यांश जरूर होता!

 मागच्या आठवड्यात झालेला दाखवण्याचा समारंभ ह्यांच्या हिशोबाप्रमाणे नव्याण्णव्वा होता. पण तिथेही त्याच कारणामुळे नकारघंटा आली होती. खरं तर मुलगा सुमार होता. नीराच्या नखाची पण त्याला सर नव्हती. पण नकाराचा त्याला

२२४ । लक्षदीप