पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
एक
१९९१ : कांदापोह्याची सेंचुरी!

 चिखलठाणा बस स्टॅडवर एस. टी. निम्म्याच्या वर खाली झाली होती. आता दहा मिनिटात औरंगाबाद बस स्टॅड येईल. रात्रभर हिंगोली-औरंगाबाद बस प्रवासानं माझं अंग आंबलं होतं. खडबडीत रस्त्यामुळे गाडी उडत होती, त्यामुळे मला नीटशी झोपही लागली नव्हती. पण हे छानपैकी घोरत होते आणि माझी छकुली - अं हं - नीरा पण माझ्या खांद्यावर साच्या अपेक्षेभंगाचं ओझं ठेवून निष्पापपणे झोपली होती.
 किती छान वे गोड दिसत होती नीरा. कुठल्यातरी पुस्तकात वाचलेलं मला आठवलं. स्त्रीचं सौंदर्य पारोशीत पाहावं! त्या कसोटीला नीरा खचितच उतरत होती. नितळ कांती, गोड व सदैव स्मित विलसित असणारा चेहरा आणि नितंबापर्यंत वाढलेले दाट काळेशार केस... तिच्या लहानपणी हे म्हणायचे, आपल्या छकुलीच्या लग्नाची चिंता नाही. कुणीही तिला आपणहून मागणी करून घेईल. पण आता वाटतंय - किती जड़ बाशिंगबळ आहे माझ्या लेकीचं. आई म्हणून गेली तीन वर्षे प्रत्येक दिवस एकच चिंता करीत उगवतो व मावळतो... कधी उजवली जाईल पोर माझी? प्रत्येक वेळी दाखवताना हल्ली नीरा उदास असते. तेच कांदेपोहे, तेच पाहाण्यास आलेल्यांचे टिपिकल प्रश्न, रूप-गुणापेक्षाही हुंड्याचा अग्रक्रमाने आलेला सवाल. आमचं दारिद्रय - त्यामुळे शरमिंद होणं. आणि पुन्हा एकवार नकाराचा निरोप वा खलिता... ‘योग नाही.'
 हे पण हल्ली वैतागलेत. मूळचा शांत स्वभाव जणू ते हरवून बसलेत. हल्ली त्यांचा शीघ्रसंतापी रुद्रावतार मलाही भेदरवतो आणि नीरा तर अधिकच संकोचून जाते. मुळातच ती मितभाषी. हल्ली दिवस दिवस अबोल - मूक असते.
 खरं तर तिला गावातच शिक्षिकेची नोकरी चालून आली होती. ड्रॉईंग कम संगीत शिक्षिका म्हणून. दोन्हीत तिची जात्याच गती होती. पण ह्यांचा सनातनी स्वभाव व धारणा आड आल्या, “मला मुलींनी नोकरी करणं पसंत नाही. आपण तिला लवकरात लवकर उजवून देऊ." त्यांचं भिक्षुकाचं घराणं, पोथी - सत्यनारायण पूजा सांगण्यात हयात गेली. तालुक्याच्या गावी असा कितीसा व्यवसाय होणार? पुन्हा शेती कूळकायद्यात गेलेली. त्यामुळे जन्मदारिद्रयाचा कपाळी बसलेला शिक्का कसा पुसला जाणार?

 पण आकाशाला फूल यावं तसं नीरा नावाचं देखणं फूल आमच्या संसारात फुलून आलं. बोलणं पण गाण्यासारखं. रेडिओ ऐकून हुबेहूब लता - आशाप्रमाणे गाणी म्हणते. तसंच छान चित्रं काढते. तिला साच्याच गोष्टींची मनस्वी हौस. रोज रांगोळी काढते, पण प्रत्येक दिवशी काही तरी त्यात नवं असतं! राहाणं पण नीटनेटकं. तांब्यात कोळसे घालुन साडीला इस्त्री करते वे घालते. माझ्याकडून तिने

लक्षदीप । २२३