पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 डॉक्टरांनी बाळावर उपचार केले... पण त्याचा डावा पाय पोटरीपासून त्या कुत्र्यांनी लचके तोडीत अलग केला होता व जिभल्या चाटीत खाल्ला होता.
 “मला माफ कर सुखदा. ही - ही माझ्या पापाची शिक्षा देवानं बाळाला नको होती द्यायला..." डॉक सद्गदित झाले होते. “पण ही शिक्षा खरी मलाच आहे - आयुष्यभर मी मला माफ नाही करू शकणार. अश्वत्थाम्याप्रमाणे ही पापकृत्याची जखम मी वागवतच जगणार. आणि उद्या मेलो तरी ती नाही भरून येणार...."
 मला डॉक काय बोलत आहेत ते मुळीच समजत नव्हतं. एवढंच जाणवत होतं की, माझा सुकुमार राजस बाळ कुत्र्यांच्या हल्ल्यात डाव्या पायानं पंगू झालाय.
 लंगडा बाळकृष्ण....
 माझं मन कडवटून आलं होतं!
 आजवर त्या विधात्यानं प्रत्येक दिवशी माझ्यावर सुखाची बरसात केली होती. आजचा दिवस पण कसा सुख-समाधान घेऊन आला होता.
 त्याचा हा असा अकल्पित शेवट?
 मला डॉकवर खूप ओरडावंसं वाटत होतं, संतापून बोलावंसं वाटत होतं. का तुम्ही मला नको असताना ती भयंकर कुत्री बाळगली? कशासाठी?
 पण बोलण्याऐवजी मला रडूच कोसळत होतं
 पुन्हा पुन्हा डॉक म्हणत होते, “आय अॅम सॉरी... रिअली सॉरी.."
 डॉकसोबत मागच्या दारापासून आलेला त्या माणसानं म्हटलं, “डॉक्टर, तुमच्याप्रमाणे मीही चिरंजीव वेदना घेऊन जगणार आहे. माझीही त्यापासून सुटका नाही."
 त्यानं मेलेल्या कुत्र्याजवळ येत त्यांच्या कलेवराला प्रथम लाथ मारली आणि विकट हसू लागला. त्यानं माझ्या अंगावर काटा आला.
 मग तो वेड्यासारखा त्या दोन कुत्र्यांच्या अंगावर नाचू लागला. त्याचं हास्य अधिकच विकट व बीभत्स होत गेलं!
 डॉक त्याच्याकडे थिजल्या डोळ्यानं, तर मीही हतबुद्ध होऊन तो रौद्र पण विकट आविष्कार पाहात होते.
 त्याचं हास्य अचानक थांबलं आणि दोन्ही हातानं पोट धरीत तो वाकला. मोठ्यानं आवाज करीत त्या कुत्र्यांच्या कलेवरावर भडाभडा ओकला....
 मला घेरी येत होती. मी डॉकच्या बाहूत कोसळले. आणि डोळ्यापुढे अंधार पसरला....

 मला त्या काळोखातही माझा लंगडा बाळकृष्ण विसरता येत नव्हता!

२१८ ॥ लक्षदीप