पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 रात्रीचे आठ वाजले हेते. तरीही रस्ते माणसांनी फुललेले होते. मी बंद काचेतून ए. सी. च्या थंड हवेत बाळासह मजेत पाहात होते. मोठमोठे शॉपिंग मॉल्स, प्रकाशानं झगझगणाच्या इमारती व वाहनांची वर्दळ.. मला या क्षणी तेही नवीन वाटत होतं व छानपैकी एंजॉय करीत होते. कारमध्ये सीडीवर माझी आवडत्या गाण्याची सीडी डायव्हरनं लावली होती. ‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना, शब्दरूप आले मुक्या भावनांना....' गीतकार जगदीश खेबुडकरांचे शब्द या क्षणी माझी धुंदी गीतातून जागवत होते.
 दवाखान्यात माझं स्वागत रिसेप्शनिस्ट मुलीनं केलं. ती मला डॉकच्या रूमच्या अँटीचेंबर मध्ये घेऊन गेली. “कुठे आहेत डॉक्टर?"
 “इथंच आहेत. येतील एवढ्यात!" ती असं शुष्कपणे का म्हणाली मला कळलं नाही. पण मला तिचा थोडासा राग आला हे मात्र खरं.
 तसंच दवाखान्यातल्या मुख्य सिस्टरनं, मी तिथं आल्यावर का दचकल्यासारखी एक्सप्रेशन्स दिली कळलं नाही. पण थोडे विचित्र वाटलं.
 डॉकच्या अँटीचेंबरला लागून एक खोली होती, तिथं मी डोकावून पाहिलं. “दोन हॉऊंड कुत्र्यांसाठी ती खोली आहे मॅडम!"
{{gap}मला कुत्रा हा प्राणी आवडत नाही, तर डॉकला त्यांचा प्रचंड शौक. म्हणून कदाचित त्यांनी दवाखान्यात कुत्री ठेवली असणार. पण तरीही दवाखान्यात त्यांना ठेवणं मला अस्थानी व नवलाचं वाटत होतं!
 का कोण जाणे, दवाखान्याचं वातावरण मला अस्वस्थ करीत होतं. मी विचार करीत होते, सारा दिवस कसा मस्त मजेत गेला, सुखाचं माप शिगोशीग भरून आलेलं होतं. आता डॉकसह लाँग ड्राईव्ह व पाव - मिसळचं चटकमटक खाणं आणि मोठ्या कपातलं मँगो आईस्क्रीम - असा त्या सुखावर कळस चढवायचा माझा बत होता. त्यामुळे कारमधून येताना मन फुलारून आलं होतं! पण दवाखान्यात मला काही तरी वेगळं वातावरण जाणवत होतं.
 इथं येऊन पंधरा वीस मिनिटं झाली केवळ, पण डॉकची प्रतीक्षा का जीवघेणा वाटतेय? त्यांना कळलं नाही का, की मी अचानक सरप्राईज देण्यासाठी इथे बाळासह आले. मग अशा कुठल्या महत्त्वाच्या कामात गर्क आहेत?
 मख्य म्हणजे मला अनइझी का वाटतंय? इथल्या हवेत काही वेगळे का वाटतंय? आणि ते अनिष्ट आहे, असं का मनात येतंय?
 मी अस्वस्थतेमध्ये अँटी चेंबरच्या बाहेर आले. बाळाला कोचावर झोपवलं. अंगावर दुलई टाकली. सिस्टरला पहायला सांगितलं व इकडून तिकडे चक्कर मारू लागले.

 दवाखान्याच्या मागच्या बाजूस फिरत गेले, तो काय, समोरून डॉक येत होते.

२१६ ॥ लक्षदीप