पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व सुख द्यावं म्हणूनच ना?
 असा सारा दिवस विलक्षण सुखाचा गेला. मला आजही प्रत्येक लहान- सहान गोष्टीत सुख दिसत होतं, प्रत्ययास येत होतं. केस वाळवीत, झोपाळ्यावर झुलत वाचलेला रोमँटिक काव्यसंग्रह, अमेरिकेतून शालेय मैत्रिणीचा आई झाल्याबद्दल अभिनंदनाचा आलेला फोन व त्या निमित्तानं मारलेल्या अर्धा तास गप्पा, बाळाशी खेळत उगीच उष्टावल्यासारखं केलेलं सुग्रास जेवण, मग छानशी वामकुक्षी, मन आळसलेल्या मूडमध्ये पडून माणिक वर्माची ऐकलेली सुंदर गाणी, दुपारचा मस्त चहा, मग घरच्या जिममध्ये केलेला तासभराचा, शरीराचा रंध्ररंध्र हलका करणारा, व्यायाम, मग शॉवर खाली थंड पाण्याने केलेली मनसोक्त आंघोळ, पुन्हा छान नटणं - वेषभूषा करणं....
 आणि संध्याकाळची चाहूल लागली. मनाची सुखावस्था कमी होत काही तरी सूक्ष्मसं बोचू लागलं. कातरवेळ ती हीच का? असं काही कारण नसताना उगाच हळवं उदास होणं पण मला हवंहवंस वाटत होतं. त्यामुळे का पुन्हा बारीकसारीक सुखाची लज्जत वाढते? असेल बाई!
 दवाखान्यातून निरोप आला की, डॉक रात्री उशिरा, नऊ - दहाला येतील. सकाळपासून ज्या सुखद गुंगीमध्ये मी बेधुंद वावरत होते, त्यातून मी ठोकर लागताच विव्हळावं तशी शहारत भानावर आले!
 स्वत:ला किती वेळ तरी समजावत राहिले. डॉक्टर आहेत ते. पुन्हा स्त्री- 'रोग तज्ज्ञ. त्याचं मॅटर्निटी सेंटर आहे. तिथं चोवीस तास पेशंटस् असतात. अनेक इमर्जन्सी ऑपरेशन्स असतात. बुद्धीला पटत होतं, पण मन मानत नव्हतं.
 आणि ठरवलं की आपणच बाळाला घेऊन 'जय महालक्ष्मी हॉस्पिटल ला जावं, डॉकला सरप्राईज द्यावं व त्यांच्या सोबत घरी यावं. त्यापूर्वी लाँग ड्राईव्ह करून मस्तपैकी या शहराची खासियत असलेली पावमिसळ आणि मोठा कपभर मँगो आईस्क्रीम खावं आणि पुन्हा सारी रात्र सुखाच्या बरसातीमध्ये चिंब भिजत गाढ झोपी जावं....
 आज मी प्रथमच हॉस्पिटलला जाणार होते. लग्नानंतर एकदाही मला डॉकनं तिथं नेलं नाही. 'तुझ्यासारख्या सुंदर ललनेसाठी ते ओसाड वाळवंटच की' अशी वर मखलाशी. खरं आहे म्हणा. मूळातच मला दवाखान्याची भीती वाटते. इंजेक्शनहीं वाटत नाही. अशा प्रसंगी नुसती सुई पाहिली तरी आधीच किंचाळते. त्यामुळे मीही कधी आग्रह केला नाही.

 पण सहा महिन्यानंतर मी इथं सासरी - माझ्या हक्काच्या घरी आले. आजच्या दिवसाचा शेवट पण मस्त व्हावा म्हणून मी डॉकला न कळवता हॉस्पिटलला जायचा निर्णय घेतला.

लक्षदीप ॥ २१५