पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 का कोण जाणे, मनोमन कुठेतरी मी भ्याले. पपा सांगायचे ते आठवलं. प्रौढ कृष्णाचे पाय असेच नाजूक गुलाबी होते. अंत्यसमयी दुरून ते पाहून पारध्याला हरिण आहे असं वाटलं आणि त्यानं बाण मारला... आई गं! कसले भलते-सलते विचार मनात आले. मी दचकले आणि तिथून ते मनाआड केले. बाळाची दुलई नीट केली.आणि त्याच्या राजस मुखाकडे पाहू लागले. पुन्हा आई म्हणून मी मोहरून आले. हा माझा अंश, उद्या मला आई म्हणेल तेव्हा कान किती तृप्त होतील! बाळ अचानक झोपेत हसला. त्याच्या गोंडस गालावरची खळी काहीशी रुंद झाली.
 लबाड़ा! झोपेत कोणती खोडकर स्वप्नं पहातोस राजा, त्यामुळे असं गोड हसू आलं? त्याच्या खळीवर मी जिभेचा ओलसर शेंडा फिरवला आणि पदरानं तो पटकन पुसलाही. पण पुन्हा एकवार मन समाधानानं निवून आलं होतं!
 मी पायात सपाता सरकवून, गाऊनची गाठ पोटावर मारून बाहेर आले. गॅलरी पूर्व दिशेला होती. नुकताच सूर्यनारायण उगवला होता. त्याचे कोवळे सोनेरी रूप आणि तापहीन किरणं त्या थंड हवेत तजेला भरत होती!
 आणि सारा दिवस कसा असाच सकाळप्रमाणे अमृतमय गेला. एका धुंदीत मी वावरत होते. आणि मनोमन अंतराळी विहरत होते.
 टबबाथमध्ये सुंगधी साबणाचा फेस करून केलेली साग्रसंगीत अंघोळ, डॉकला आवडतं म्हणून पैठणीचा शिवलेला स्लीवलेस पंजाबी सूट, डॉकनं माझ्या ओलसर केसात पाठमोरी मिठीत घेत आपलं तोंड खुपसणं, मग माझ्या लटक्या रागाला न जुमानता सकाळचा रंगलेला शृंगार, मग मिळून केलेला शाही ब्रेकफास्ट, डॉक्टरांना गॅलरीतून त्यांची कार दिसेनाशी होईपर्यंत दिलेला निरोप मग आख्खा दिवस मी आणि माझा बाळ. त्याचं दाईकडून मालीश करून घेणं, स्वतः पायावर घेत त्याला आंघोळ घालणं आणि त्याला मुकेच्या वेळी अंगावरचं पाजणं आणि प्रत्येक वेळी आई म्हणून तृप्त होणं. आणि वेळात वेळ काढून केलेली पूजा, माहेरून आणलेल्या लंगड्या बाळकृष्णाची पण स्नान - अभिषेकयुक्त पूजा केली. कृष्णाच्या बाळलीला आठवताना उद्या आपलं बाळ थोडं मोठं झाल्यावर अशाच खोडकर क्रीडा करेल, त्या पाहातानाअनुभवताना माझ्यातली आई तृप्त होईल.

 फक्त दुपारी डॉक घरी जेवायला आले नाहीत हाच एक निराशेचा क्षण. पण ते प्रथितयश डॉक्टर आहेत व आज बरीच ऑपरेशन्स आहेत म्हणून जमलं नसेल यायला, असं मानीत मनातला खट्टपणा काढून टाकला. त्यांना मोठा टिफीन त्यांना आवडणा-या पदार्थांनी भरून पाठवला. तासभरानं त्यांचा एस. एम. एस. आला. ‘बँक्स फॉर ग्रेट मील. लव्ह यू सुखदा!' मी खुदकन हसले. खरं तर त्यांनी एक फोन करून हे म्हटलं असतं तर कानात अवघा प्राण गोळा झाला असता. पण, जाऊ दे. बये, ते एवढे काम करतात ते तुझ्या वे बाळासाठीच ना? तुम्हाला ऐशआरामात ठेवावं

२१४ । लक्षदीप