पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पहिला दिवस. त्याची ही अशी सुरेल सुरुवात झाली होती.
 मन सुखानं उचंबळून आलं होतं! मी हलकेच पांघरूण सारलं व डॉकच्या एक दिवसाच्या वाढलेल्या दाढीवर अलगत माझे ओठ टेकवून बाळाची जशी मी पापी घेते तसा हलकेच किस घेतला. त्या एक दिवसाच्या वाढलेल्या दाढीनं माझ्या नाजूक ओठावर तरलशी हुळहुळी आली. ती देखील मला अतीव सुखद वाटली. किती शांत, तृप्त झोपला होता माझा नवरा- डॉक. होय, डॉक्टर आहेत ते. स्त्रीरोग तज्ज्ञ. मी त्यांना प्रेमानं डॉक म्हणते, त्यांनाही ते आवडतं. खरं, माझं सारंच त्यांना आवडतं. ‘तु मला अंतर्बाह्य, नखशिखान्त आवडतेस. एवढं सुंदर रूप, एवढं काव्यमय कोमल मन आणि आता मला पुत्ररूपानं दिलेली जगातली सर्वात मोठी सर्वोत्तम भेट... तू माझ्यासाठी अक्षय्य सुखाची ठेव आहेस. म्हणून आजपासून तुला मी सुखदा म्हणणार...'
 माझ्या माहेरी डॉक मला व बाळाला भेटायला दर रविवारी यायचे. तो दिवस माझ्यासाठी हरक्षण विशेष असायचा. मी दिवसभर त्यांच्याभोवती अखंड चिवचिवत असायची. पपा म्हणायचे, ‘अग, आम्ही पण आहोत बरं! पण नव-याखेरीज कुणी दिसतच नाही तुला.' पपांचा हा कृतककोपहीं मला समाधान देऊन जायचा. मी फक्त खुदकन हसायची. त्या रविवारी पण मी डॉकभोवती रुंजी घालत होते. बाळाला पदराआड घेऊन अंगावरचं पाजताना एक माता म्हणून मी एक गाढ, संपृक्त तृप्ती अनुभवत होते. आणि डॉक माझ्याकडे अनिमिष नेत्रानं पाहात असताना ‘सुखदा' असं म्हणाले.
 सुखदा... किती छान काव्यमय नाव. लग्नात माझं नाव त्यांनी बदललं नाही. कारण तेही डॉकला भारी आवडायचं -मानसी. आहेसच तू माझ्या मनासारखी' असं स्पष्टीकरणही मला भावलं नाही! पण आज एकांतांत म्हणण्यासाठी त्यांनी माझं नामकरण केलं- सुखदा. आणि आनंदानं टचकन डोळ्यात पाणी आलं माझ्या. माझ्या या सुखाला कधी दृष्ट तर लागणार नाही?
 आताही मी क्षणभर दचकले. पण ते विचार बाजूला सारीत मी बाळाच्या पाळण्याजवळ आले. स्वारी पण डॉकप्रमाणे छानसा गाढशा झोपेत होती. आपला इवलासा अंगठा ओठात धरून, माझ्या वात्सल्याला भरतं आलं. पण स्वत:ला आवरत त्याची झोपमोड होणार नाही अशा बेतानं त्याच्या नाजूक गुलाबी गालावर टेकले. त्या शमी स्पर्शानं मोरपीस फिरताना उठावे तसे रोमांच उठले. मघाशी डॉकच्या एक दिवस वाढलेल्या दाढीचा हुळहुळता स्पर्श व आताचा बाळाचा हा मुलायम मोरपिशी स्पर्श... दोन्ही स्पर्श सुखाचे. ते मी सर्वांगानं अनुभवत होते आणि सुखावत होते.

 बाळाच्या अंगावर शुभ्र रेशमी दुलई होती. माझं लक्ष त्याच्या दोन्ही पायांकडे गल. झोपेत हालचाल केल्यामुळे दुलई विस्कटली होती. आणि त्याची दोन्ही पावलंहीं उघडी पडली होती. गुलाबी रंगाची, अम्लान!

लक्षदीप । २१३