पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जगदीशचंद्र बोसचा अभ्यासलेला धडा इतक्या वर्षानंतरही तुम्हाला आठवतो. त्यामुळेच न पाहिलेल्या व आत्ता कुठे चार महिन्याचा गर्भ झाल्यामुळे आकार यायला सुरुवात झाली होती, तो प्राण हरवलेला गर्भ पाहायला धीर होत नाही ना? कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या रूपाची छाया दिसली असती, किंवा जिच्यावर तुमचं निरतिशय प्रेम होतं त्या बाळंतपणात दगावलेल्या बहिणीचं रूप दिसलं असतं तर तुमच्या नकळत तुमचा जीव हेलावला असता. अभावितपणे डोळ्यात अश्रुचे थेंब तरळले असते... ते तुमच्या धीरगंभीर, स्थितप्रज्ञ वृत्तीला शोभलं नसतं! असो.
 पण या वेळी तुमच्या बायकोचा फार आग्रह आहे, म्हणून तुम्हाला डॉक्टरांना विचारणं भाग आहे. एक मात्र नक्की, तो स्त्री भ्रूण तुम्ही बायकोला नाही दाखवणार हे नक्की. तिच्या हळव्या मनाची तुम्हाला काळजी वाटतेय ना! बरोबर आहे. तिसरा गर्भपात - मुलगी आहे, म्हणून हे तिच्यासाठी सहन करणं कठीण आहे. त्यातून तिला सावरणं आवश्यक आहे. कारण तुम्हाला कुलदीपक हवाय. त्यासाठी पुन्हा तिच्यावर तुम्ही बाळंतपण चार-दोन महिन्यात लादणार... कशाला नकारार्थी मान उगाच हलवता? आम्हाला नाही फसवू शकणार बच्चमजी. हम सबकी खबर रखते है.
 पण तुम्ही आज तो तुमच्या वीर्यातून आकारास आलेला व पोटातच खुडला गेलेला गर्भ पाहायची हिंमत करणार आहात - ब्रेव्हो! तुमच्या धिटाईला दाद देती महाशय!

 खरंच, तुम्ही धीराचे आहात. तुम्ही शांतपणे, निर्विकार चेह-यानं तुमच्या इच्छेनं व भरपूर दिलेल्या पैशानं डॉक्टर महाशयांच्या द्वारे तुम्ही आपल्याच रक्ताचा, वीर्याचा व जीवनाचा अंश असलेल्या व मारलेल्या स्त्री भ्रूणाचा, गर्भाचा तो मांसल रक्ताळलेला गोळा पाहात आहात. तुमच्या मनात थोडी तरी कालवाकालव नक्कीच झाली असणार. पण तुमच्यातला पुत्राचा मोह पुन्हा वरचढ ठरत असणार. तुम्ही स्वत:ला बजावलंत ना, “मला मुलगा हवा होता शास्त्र परंपरेनुसार, घराणं व आडनाव पुढे चालावं म्हणून. मला मॅक्टीकल व्हायला हवं! हे असले सेंटिमेंटल विचार पुन्हा मनात यायला नकोत. ते मला मुळापासून खुडून टाकायला पाहिजेत!”
 तुमच्याच जातीचे डॉक्टरमहोदय, पुरुष आणि पुरते धंदेवाईक, कशाही मार्गानि लक्ष्मीदेवता आली तरी ती स्वागतार्ह असं मानणारे. इतर अनेकांप्रमाणे हा प्रश्न तम्हालाही पडला असेल ना की, हे डॉक्टर ज्या महालक्ष्मीचे भक्त आहेत, तो महालक्ष्मी म्हणजे पैसा - धनसंपदा तर नाही? वाच्यार्थाने व भावार्थाने पैसा उर्फ लक्ष्मी ही सर्वश्रेष्ठ म्हणून महालक्ष्मी - चीफ गॉडेस ऑफ वेल्थ! तिचे डॉक्टरमहाशय भगत - निस्सीम!

 “डॉक्टर, या पाडलेल्या गर्भाचं तुम्ही काय करता?” तुमचा प्रश्न ऐकून डॉक्टर

२१० ॥ लक्षदीप