पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकाशात दिसणाच्या महालक्ष्मीच्या तसबिरीनं!
 डॉक्टर महाशय देवीचे परमभक्त आहेत. ते दररोज सकाळी स्नानानंतर देवीचं मुखदर्शन करून मगच ब्रेकफास्ट घेतात व आपल्या दिवसभराच्या कामाला लागतात. आत वेटिंग रूममध्येहीं देवींची सालंकृत प्रतिमा आहे.
 पण ती गर्भवती मातांना खचितच दिलासा देत नाही. कारण त्यातल्या ब-याच जणी रिकाम्या कुशीनिशी व रित्या हातांनी परततात! त्यांचे नवरे व सासवा मात्र मनोभावे देवीला परत जाताना नमस्कार करीत मनोमन म्हणतात, “माते, तूच संकटातून वाचवलंस?"
 दवाखान्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. दवाखान्यात साखळदंडानं बांधलेले दोन आडदांड, वाघाची बछडी वाटावीत, असे हाऊंड कुत्रे! खास अफगाणिस्थानच्या काबूलहून आणलेली ही शिकारी कुत्री आहेत. त्यांचं हिंस्र सौंदर्य तुम्हाला जाणवतं ना?
 दवाखान्याच्या शेवटच्या टोकाला भलं मोठं कुलूप लावलेलं व लोखंडी जाळीनं बंद केलेलं एक बंद दार तुम्हाला दिसेल. ते दार स्वत: डॉक्टर कधी तरी रात्री - अपरात्री उघडतात आणि मग साखळ्या धरून कुत्र्यांना तिथं डॉक्टरांचे दोन कंपाऊंडर, जिवा आणि शिवा घेऊन जातात. ही त्यांची टोपणनावं आहेत बरं का. डॉक्टरांनी एका दमात हाक मारायला सोपी जावीत म्हणून ठेवलेली.
 दारापलीकडे काय आहे हे मात्र कुणालाच माहीत नाही. जिवा - शिवा तिथं कुत्री का घेऊन जातात व त्यापूर्वी हमखास डॉक्टर का जातात हे मात्र कृपया विचारू नका.
 उगाच चोंबडेपणा नको महाशय! तुम्ही तुमच्या कामाशी मतलब ठेवा. पाणी घाल म्हटलं, की पायावर पाणी घालावं, यजमानाच्या वा पाहुण्याच्या भिकबाळीकडे पाहू नये, ह्या जुन्या कालबाह्य झालेल्या म्हणीची तुम्हाला आठवण करून देतो. समझनेवालोंको इशारा काफी है!


 काय, भलताच हट्ट धरलाय तुमच्या पत्नीनं? तिला समजवा की राव. एवढं हिंमतीनं तिस-यांदा तिचा पोटातला गर्भ मुलीचा आहे म्हणून पाडून टाकलात. क्षणाचाही विचार केला नाही. तुमच्या मनावर थोडा पण ओरखडा उमटला नाही. मानलं राव तुम्हाला. भले हिंमत बहाद्दर!
 पण तरीही तुम्हाला बायकोला समजावून सांगता येत नाही? बरोबर आहे, ती सारखी पदर डोळ्यास लावून टिपं गाळते आहे. स्त्री ना ती. तिच्या डोळ्यात अश्रपिंडांना काय कमी - तिचं रडणं तुम्ही मनाला लावून घेत नाही हे ठीकच आहे. पण अशा वेळी रागवता येत नाही. आवाज चढवून चूप पण बसवता येत नाही.

 एकच तिचा हट्ट. “मला पाडलेला गर्भ पाहायचा आहे. तो मला आपल्या

२०८ लक्षदीप