पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेतमजूर वा छोटे-मोठे व्यापारी असो, आपल्याला त्यांचं नशीब म्हणून आजोबांचं, क्वचित प्रसंगी पणजोबाचं नाव आठवतं; कारण अजूनही भिंतीवर वाळवीनं खालेल्ली व तडा गेलेल्या काचेसह त्यांची तसबीर आहे. ते केवळ जन्मले, वाढले, जगले, संसार केला, तुमच्या वडिलांना - आईना जन्म दिला आणि एक दिवस मरून गेले. ते तुमच्याही क्वचितच स्मरणात श्राद्ध, पितरपंधरवडा प्रसंगी - बाकी त्यांची कुणाला आठवण आहे? तरीही तुम्हाला वंशाचा दिवा हवाय, जसा यांना हवा होता व तो त्यांनी तुमच्या रूपाने पैदा केला व धन्य धन्य झाले. तुमच्या पत्नीनं त्यांचे म्हातारपणी हाल केले, काही जणांना सरकारी मातोश्री वृद्धाश्रमात वा पैसा असला तर खाजगी वृद्धाश्रमात राहावं लागतंय. ते तुम्हाला चांगलं माहीत आहे. तरीही तुम्हाला वंशसातत्यासाठी व आडनाव पुढे नेण्यासाठी कुलदीपक हवा आहे. तुम्ही कबूल नाही करणार, पण उद्याच्या एकविसाव्या शतकाच्या आधुनिक चंगळवादी जगात तुम्हाला तुमची मुलं विचारतील की नाही, याची मनोमन धास्ती आहे. तरीही वंशाला दिवा हवाच. ते काही मनातून जात नाही. खरं ना?
 हो, त्यासाठीच तर तुम्ही ‘जय महालक्ष्मी हॉस्पिटल मध्ये आला आहात ना. पहिल्या वेळी विचार नाही केला, मुलगी झाली. पहिली बेटी धन की पेटी' म्हणून समाधान मानलं. खरं तर तुमच्या मते ‘कोई भी बेटी खर्चे की पनौती आहे. पण समाजात वावरताना तसं बोलता येत नाही. कारण तुमची आधुनिक पुरोगामी प्रतिमा तुम्हीच तयार केलीय. ना. ती जपणं भाग आहे. दुस-या वेळी मात्र तुम्ही हुशारीनं तपासून घेतले आणि मुलीचा गर्भ म्हणून पाडून टाकायला बायकोला बळजबरी केली. एवढंच नव्हे तर दोन तीन गर्भपात, अॅबॉर्शन लादले. त्यात तिची रया गेली म्हणून बाहेर मजाही करता. तिनं तक्रार केली तर तिला धमकी देता, “आता काय राहिलंय तुझ्यात? जरा बाहेर सुख पाहिलं तर नाक वर करीत तक्रार करतेस? आणि कबूल करा की, तुमचा हातही प्रसंगी उठायचा. तिला बिचारीला सावरून घेत चार लोकापुढे म्हणावं लागतं की, “तसं काही नाही. मीच पाय घसरून पडले होते, त्यामुळे ही जखम झाली!' हेच वा असंच कारण तिनं गर्भपात झाल्यावर शेजारी पाजारी सांगितले असणार.... जाऊ द्या साहेब! उगीच मला तुम्हाला शरमिंदा करायचं नाहीये.
 पण सार शहर जाणतं, “जय महालक्ष्मी हॉस्पिटल' मध्ये तपासणी करायला लोक का जातात? तुम्ही उगी आपलं कानकोंडं होऊ नका.
 चला, बिंधास्त चला! तुमचं सारं निस्तारायला व तुमचं रक्षण - कल्याण करायला ती महालक्ष्मी माता समर्थ आहे.
 हे मी नाही, खुद्द डॉक्टर सांगतात या हॉस्पिटलचे!

 'जय महालक्ष्मी हॉस्पिटल'ची सुबक दुमजली इमारत आहे, ती प्रथमदर्शनी नजरेत भरते ती प्रवेशद्वाराच्या वर भिंतीमध्ये चोवीस तास चमचमणाच्या विद्युतमाळच्या

लक्षदीप ॥ २०७