पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यानंतर गर्भपातही!"
 पण कायद्याप्रमाणे लिंगचाचणीला बंदी आहे ना?"
 “अरे, आपल्या देशात कायदे खूप आहेत, पण कायद्याचे राज्य कुठंय? आणि सर्व डॉक्टरांना झटपट श्रीमंत व्हायचंच असतं. आणि तुझ्यासारखे मुलगाच हवा म्हणणारे का कमी आहेत समाजात? त्यांचं त्यामुळे फावतं!"
 "तू... तू मला त्यातलाच एक समजतोस? काहीशा अपराधी भावनेनं गणेशनं विचारलं, “मी सहज बोलून गेलो."
 “मी काही समजत नाही, आणि निष्कर्षही काढीत नाही." मित्र म्हणाला, “अब दिल्ली दूर नाही. मला काय, जगालाही यथावकाश आऊटकम कळेलच!”
 रात्रभर गणेशाला झोप आली नाही. मनात ती माहिती विषासारखी भिनत गेली. विवेकी मनावर मात करीत त्याचं पक्कं ठरलं गेलं, की, आपण सोनोग्राफी टेस्टच्या वेळी डॉक्टरकडून लिंगनिदान करून घ्यायचं.
 आणि देवीचा कौल खरा ठरला आणि लिंगनिदान चाचणीतही मुलगीच निघाली तर?
 गर्भपात? भ्रूणहत्या?
 हे दोन शब्द मनाभोवती पिंगा घालत होते. पण मन कचरत होते आणि मित्राची भीती वाटत होती. त्याच्यापुढे आपला ‘वीकनेस’ उघड झाला होता. उद्या त्याला रोज कंपनीत कसा तोंड देऊ?
 पण दोनच दिवसात तो मित्र कंपनी सोडून नोयडाला दुस-या एका कंपनीत अधिक मोठ्या पदावर जॉईन झाला. आणि गणेशाचा जीव भांड्यात पडला.
 आणि ती असुरी कल्पना गणेशाचा पिच्छा सोडेना. ऑक्टोपसप्रमाणे आठ टेंटॅकल्सद्वारे चहूबाजूंनी त्याच्या मनाचा कब्जा त्या अघोरी विचारानं घेतला होता.
 सोनोग्राफी टेस्ट करताना डॉक्टरांनी भरमसाठ फी आकारून लिंगनिदान चाचणीचा निष्कर्ष सांगितला - “मुलगी!”
 त्यानंतरचा महिना त्याच्यासाठी अस्वस्थ खदखदीचा होता. पण तो सावध होता. कुणाशीही चर्चा-मसलत करायची नाही, जे काही करायचं ते आपल्या मनानं, असं त्यानं ठरवून टाकलं होत!
 इकडे सरिता मुलीच्या स्वप्नरंजनात रमली होती. नवग्याशी बोलताना त्याच गप्पा. पण एकतर्फी, तो केवळ हां हुं करत कोरडा प्रतिसाद द्यायचा हा त्याचा अबोला आई होण्याच्या सुखामध्ये न्हाऊन निघताना सरिताच्या लक्षात येत नव्हता.

 तिनं माधुरी - मधुबाला ह्या दोन सिनेनट्यांच्या देखण्या तसबिरी एक दिवस बेडरूममध्ये लावल्या. त्याला त्याचं कारण सांगताना ती म्हणाली, “मला तुला जगातली सर्वात सुंदर कन्या द्यायची आहे. म्हणून या तसबिरी!"

२०० । लक्षदीप