पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उलटपक्षी ती म्हणाली, “तुम्ही भाग्यवान आहात, पहिली बेटी धनाची पेटी हे खरं ठरलेलं मी पाहातेय. तुम्हाला बढतीनं सीनियर एक्झिक्युटीवचं प्रमोशन मिळालं, हा येणा-या बेबीचा पायगुण समजायला काय हरकत आहे?"
 स्पर्धेत दोन सीनियर असताना गुणवत्ता व मेहनतीच्या जोरावर सीनियर एक्झिक्युटीवचं कंपनीत मिळालेले पद त्यालाही सुखावून गेलं. पण हा येणा-या बाळाचा पायगुण मानायला त्याचं मन तयार नव्हतं. कारण देवीला लावलेल्या कौलाप्रमाणे मुलगी जन्मणार होती.
 त्याच्या छद्मी मनानं पुन्हा टोकलं, “समजा, देवीचा कौल मुलाच्या बाजूने असता तर हा पायगुण वाटला असता की नाही?"
 दिवसेंदिवस सरितेच्या अंगावर गर्भारपणाचं तेज पसरत होतं. ती केतकीसारखी पिवळीधमक रसरसत होती. तिच्याकडे पाहाताना नजर हटवू नये एवढी ती बहरून आली होती. त्याचं सौंदर्यसंपन्न मन तिचं ते लावण्यरूप प्राशन करायला सदैव अधाशी असायचं.
 पण त्या सदैव प्राशनानं होणा-या तृप्तीतही एक अतृप्ती होती. आपल्याला पहिली मुलगी होणार आहे. पुन्हा दुसरं अपत्य होईल - न होईल. कोण जाणे. आजकाल वाढत्या प्रदूषित वातावरणात स्त्रियांची जननशक्ती कमी होतेय, असं म्हटलं जातं!
 त्याला आपल्या मनातील या उलटसुलट विचारांचा राग येत होता. आणि शीणही जाणवत होता. आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत. आधुनिक तंत्रशिक्षण व नोकरी असूनही आपण पुराणपुरुषाप्रमाणे जुन्या विचारांचे प्रतिगामी कसे? हे त्याचं त्यालाच उमगत नव्हतं. आपण एवढं शिक्षण घेऊनही व देश विदेश हिंडूनही शंभर टक्के पुरुषी वृत्तीचेच आहोत, ही विदारक जाणीव त्याला स्वत:ला आपल्याच नजरेत शरमिंदी करीत होती!
 पोटातल्या बाळाची वाढ वे प्रकृती पाहण्यासाठी सोनोग्राफी चाचणी करायची होती, त्याच्या आधी काही दिवस गणेशानं आपल्या मनातील खदखद आपल्या मित्रापुढे पोटात व्हिस्कीचे दोन पेग गेल्यावर व्यक्त केली. तेव्हा मित्रानं सरळ सल्ला दिला, “त्यात एवढं काय आहे? सेक्स डिटर्मिनेशन - लिंग-निदानाची टेस्ट करून घे, अन खात्री कर!"
 “अशी टेस्ट करता येते?”

 "तुला माहीत नाही?" तो मित्र त्याच्याकडे आश्चर्यानं पाहात त्याला खुळा समजून काहीसा खिजवत म्हणाला, “अरे, अशा डॉक्टरचं पेव फुटलंय आपल्या जिल्ह्यात, अरे, सोनाग्राफी मशीन हे गर्भातील विकृती पहाण्यासाठी, वाढ पाहाण्यासाठी जसं उपयुक्त आहे, तसंच त्याद्वारे बारा आठवड्यानंतर लिंगही जाणून घेता येतं. आणि

लक्षदीप । १९९