पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/197

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "अंहं, माझी खात्री आहे, मला मुलगीच होणार." सरिता म्हणाली, “तुम्हाला आठवत नाही का? आपण अंबाबाईच्या दर्शनाला गेलो होतो, तेव्हा मुलीच्या बाजूनं कौल पडला होता."
 “हो, तसं तू म्हणाली होतीस. पण हे कौल-बिल काही खरं नसतं.” तो काहीसा अस्वस्थ झाला होता. खरं तर त्यानंच तिला कौल लावायला सुचवलं होतं. तसा तो फारसा धार्मिक नव्हता आजवर कधी. पण बाळ होणार असल्याचं कळलं आणि तो मनोमन बदलला. हळुवार झाला आणि आजवर कधी न जाणवलेली एक सुप्त लालसा मनोभूमीवर तरारून आली - आपलं पाहिलं मूल हे वंशाचा दिवा असायला हवं! आपल्याला मुलगाच हवा.
 त्याच्या घराण्यात मुलींचा सुकाळ. त्याला आधीच्या तीन व पाठची एक बहीण होती. त्याला काका नव्हता.. आत्या दोन. आईकडच्या घरी पण अशीच अवस्था, त्यामुळे त्यांचं लग्न झाल्यापासून व विशेषत्वानं सरिता गर्भार राहिल्यापासून वडील काय, आई काय, बहिणी व आत्या काय, सारेच ‘पेढा हं!" असंच बजावायचे.
 सरिता गणेशप्रमाणे विज्ञान शाखेची पदवीधर. पण लग्नानंतर स्वत:हून पूर्ण वेळ गृहिणीपदाचा स्वीकार केलेला. तिला दिवस गेले तेव्हा आपण आई होणार याचा आनंद होता, पण घरचे जेव्हा उठसूठ तिला 'पेढा हवा, बफ नको गं बाई!" असं सुचवू लागले, तेव्हा ती नाराजीने व स्पष्टपणे नव-याला म्हणाली “हे काय, मुलगा की मुलगी हे काय आपल्या हाती असतं? जे व्हायचं ते होऊ दे..."
 “पण मला मात्र, खरं सांगतो राणी, मनापासून मुलगा हवा आहे."
 “तुम्हीही तसेच - इतरांसारखे." त्याच्याकडे ती क्षणभर अविश्वासानं पाहात राहिली. ठरवून केलेलं लग्न असलं तरी, त्याचा उमदा प्रेमळ स्वभाव पाहाता ती वानिश्चयापासून त्याच्या मनस्वी प्रेमात पडली हेती, वाङनिश्चय ते विवाह या तीन महिन्याच्या काळात ते दोघे प्रेमीजनांप्रमाणे वावरत होते. तो तिला उदार व स्त्रीपूजक वाटला होता. सासूबाईंचा बोलभांड व काटेरी स्वभाव असला तरी त्याचा आईवर केवढा जीव होता. बहिणीसाठी किती दक्ष होता. एका आत्याच्या आजारपणात त्याच्या मुलाबरोबर पंधरा दिवस रजा घेऊन त्यांनही तत्परतेनं शुश्रूषा व दवाखाना केला होता. हे सारं तिला मनस्वी भावलं होतं. तो स्त्रीप्रति मार्दवशील आहे. आपल्याला जपेल, आपलं मन सांभाळेल, हा विश्वास तिला त्याच्या निकट घेऊन गेला होता,
 आणि लग्नानंतरची ही दोन वर्षे त्या तिच्या विश्वासाच्या कसोटीवर सार्थ उतरलेले होते. तो तिचं मन कसोशीनं जपायचा. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण त्याच्यासाठी आज्ञा असावी अशी तत्परता तो त्या पुन्या करताना दाखवायचा,

 असा आपला नवरा आज हे काय बोलतो आहे? क्षणभर तिचा विश्वास बसला नाही. मुलाची इच्छा असावी यात तिला काही गैर वाटायचं नाही. पण 'पेढा हवा, बर्फी

लक्षदीप । १९७