पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/195

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४. माधुरी व मधुबाला


 जवळपास महिन्यापासून त्यानं दीर्घ मुदतीची रजा काढलीय ऑफिसमधून, तिच्याजवळ राहाता यावं म्हणून. तिला सावरावं, पुन्हा ती पूर्वीसारखं उत्फुल्ल गुलावासारखी टवटवीत व्हावी म्हणून.
 पण ती त्याला नजरेसमोर थांबू देत नाहीये. त्याला पाहिलं की हिस्टेरिक होतेय. क्षण दोन क्षण तिची ती कडेलोटाच्या पलीकडे गेलेली विदीर्ण अवस्था पाहून अधिकच मनोमन शरमिंदा होत बेडरूममधून तो पाय काढता घेतो. जिथं, त्या घटनेपूर्वी कधीच बसत झोपत नसे, त्या गेस्ट रूममध्ये जाऊन आढ्याला नजर लावून तो पडून राहातो. अस्वस्थ, बैचेन. त्याची ही अपराधी, बैचेन अवस्था अधिकच शोचनीय होते, जेव्हा त्यांच्या दोघांच्या खास असलेल्या भावविश्वाच्या बेडरूममधून तिचे हुंदके आणि वरकरणी वेडसर वाटणारे पण वेदनेच्या खोल डोहातून उमटलेले शब्द कानावर पडतात....
 मी काय करू? तिला कसा सावरू? का मीच आज ती ज्या अवस्थेतून जातेय, तसाच नियंत्रणहीन होत भावनिक संतुलन गमावून बसेन?
 नाही, ही माझी स्थिती मला, या घराला परवडणारी नाही. मुख्य म्हणजे तिला पूर्ववत करायचं आहे, त्यासाठी मला खंबीर व स्थिर राहिलं पाहिजे - मानसिकदृष्ट्या.
 आईला आपण बोलवून घेतलं होतं. सुनेला तिनं मायेनं सांगून धीर द्यावा म्हणून. पण तो अंदाज चुकलाच. “तुला मी आधीच लग्नापूर्वी बजावलं होतं की, ही पोरगी नादिष्ट आहे. संसाराला उपयोगाची नाही. आता गर्भपात का कुणाचा होत नाही? आणि मुलगा हवा ही अपेक्षा का चुकीची आहे? थोरल्या मुलानंतर ओळीनं तीन मुलींवर तू झालास - त्या काळी नव्हती ही आजची तंत्र! नाहीतर
 हळू आई. असं काही बोलू नकोस. तिच्या कानावर हे पडायला नको." तो घाईघाईनं अस्वस्थ होत आईला चुप बसायचा इशारा करतो. त्यानं ती चांगलीच भडकते व अधिकच तावातावानं बोलू लागते,

 गणू, एवढा बायकोवेडा झाला असशील असं मला वाटलं नव्हतं. एवढं प्रेम

लक्षदीप ॥ १९५