पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/190

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होती. माझ्या प्रतिभाशक्तीनं त्यात मी त्यांच्या जीवनतत्त्वज्ञानाचा शोध घेतला होता. वेगळ्या ननैतिक जीवनतत्त्वज्ञानाची ती शोधयात्रा खरंतर माझ्या स्वत:साठी होती. पुढील जीवन जगताना तत्त्वज्ञानरूपी बळ देण्यासाठी होती.
 आज मदरच्या पश्चात तिच्या घरात वावरताना मला गलबलून येत होतं. आणि पपांना जीवनाच्या शेवटी जो प्रश्न पडला होता, तो पुन्हा मनात उसळी मारून संत्रस्त करीत होता. त्याच्या पाश्र्वभूमीवर मदरच्या जीवनाची गोळाबेरीज नवे नवे सवाल उभे करीत होती. त्यातला सर्वांत प्रमुख सवाल होता - मी जे जीवन जगलो, ते सफल होतं की ती अरूपाची केवळ एक अंधयात्रा होती?
 आमच्या घरच्या जुन्या नोकरानं मला एक पत्र व बंद पाकीट आणून दिलं. ते पत्र माझ्या मदरचं होतं. अतिशय त्रोटक. तिनं मला उद्देशून कदाचित मरण्यापूर्वी काही काळ आधी लिहिलं असावं.
 “ज्या पिस्तुलानं तुझ्या पपांनी आपल्या पापमय जीवनाचा शेवट केला, ते सांभाळून ठेवलेलं शस्त्र मी तुला भेट देत आहे. तुलाही कधी काळी त्याची गरज भविष्यात भासेल म्हणून. पण बेटा, तू तरी त्यांच्यासारखं अंतिम सत्याकडे पाठ फिरवू नकोस. धैर्याने त्याला सामोरं जा! आणि त्यावेळी त्या दीनदयाळू प्रभूला, आकाशातल्या बापाला शरण जायला कचरू नकोस!"
 पत्रासोबतचं पाकीट सुन्नावस्थेत उघडलं. त्यात माझ्या पपांचं प्रिंय असं छोटेखानी पिस्तूल होतं. ते कुरवाळीत पुन्हा पुन्हा मदरचं ते शेवटचं पत्र मी वाचत होतो. त्यातून मला नियती गूढ पण सूचक इशारे देत होती.
 खरं तर मी फार थकून गेलो होतो. मनाला प्रचंड शिणवटा जाणवत होता. वयाच्या पन्नाशीनंतर वृद्धत्वाकडे वाटचाल करताना अनेक शारीरिक व्याधींनी मी पोखरला गेलो होतो. बेबंद जीवनाची मला निसर्गानं ती शिक्षा दिली होती, त्याच्या रिवाजानुसार न चुकता! आजवर जे अफाट जीवन जगलो, जी बेफाट साहसं केली, पाप-पुण्य, नीती-अनीतीचा विचार केला नाही, त्या माझ्या झंझावाती बेफाम जीवनाचा काय सारांश होता? डझनभर कादंब-या, पाऊणशे कथा, दोन नाटकं, तीन चित्रपट कथा - पटकथा आणि अनेक जागतिक साहित्यिक मानसन्मान व पुरस्कार! रक्ताचे पाणी करून, प्रत्येक वेळी सर्वस्व पणाला लावत नवनवे अनुभव घेत लिहिलं. तेच का जीवनाचं श्रेयस होतं? तर मग हे असमाधान का? मदरच्या शापामुळं? अंहं, आजवर असं कधी चुकूनही वाटलं नाही. तर मग आज मग त्या शंकेनं का व्याकूळ होतंय? कदाचित तिनं पत्रासोबत पपांनी ज्या पिस्तुलानं आत्महत्या केली, ते मला भेट दिल्यामुळे असेल. जीवनाचे अंतिम क्षण जवळ आल्याचं राहून राहून का वाटतंय? आजवरच्या जीवनाचा सारांश शून्यवत का वाटतोय?

 नाही, हे सारे माझ्या संभ्रमित, गोंधळलेल्या मनाचे खेळ आहेत, खुळे विचार

१९० । लक्षदीप