पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/189

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काहीही कारण नसताना त्यांनी शांतपणे कानशिलावर पिस्तुलानं चाप ओढून जीवनाचा शेवट केला होता. आणि त्यापूर्वीचं ते त्यांचं अंतिम पत्र! मला वाटलं, आयुष्यात त्यांनी प्रथमच मला उद्देशून एवढा प्रदीर्घ मजकूर लिहिला असावा. ते पत्र मला आजही बुचकळ्यात पाडतं.
 "बेटा, मी आज आत्महत्या करायला निघालो आहे. त्यापूर्वी तुला हे पत्र लिहीत आहे. स्वत:च्या हातानं कानशिलावर पिस्तुलाचा चाप ओढून मी जीवनाचा अंत करतोय. काय गंमत आहे नाही? आधी मी ठरवलं, स्वत:चा शेवट करायचा आणि त्यानंतर विचार करतोय, त्यामागील कारणांचा. त्यासाठी कधी नव्हे ते पेन बोटात धरलं आहे. लिहिण्याची सवय मोडलीय ना, म्हणून अक्षर कापर, अडखळत येतंय. त्याबद्दल माफ कर. अक्षरं नीट जुळवून वाच हं!
 “माय सन! अवघं जीवन मी कैफात जगलो. हा कैफ, ही नशा होती नित्यनूतन शोधाची. जंगल, पशुपक्षी, सागर लाटांवर हिंदकळणारं, अनिश्चित निसर्गावर अवलंबून असलेलं जीवन, बुलफाईटसारखे अचाट साहसी खेळ. आणि नव्या नव्या नशांचा शोध. सतत मी अस्वस्थ होतो म्हणूनच असेल कदाचित, मी अशा कैफात राहिलो. माझी आंतरिक अस्वस्थता दडविण्यासाठी असेल कदाचित, हे सारं केलं. एक अनिर्बध वादळी जीवन पत्करलं व अतार्किक निष्ठेनं त्याच्याशी इमान राखलं! पण बेटा, निसर्गक्रम कुणाला चुकला आहे? उसळी मारणारं रक्त थंडावू लागलं, गात्रं सैलावू लागली आणि वाटू लागलं, जे जीवन जगतो ती एक निरुद्देश नशा होती. तुझ्या आईच्या, माझ्या मेरीच्या ज्या धर्मनिष्ठ पवित्र जीवनाचा सदैव मी उपहासच केला. तोच जीवनाचा खरा मार्ग होता का, हा जीवघेणा प्रश्न मला सतावू लागला, त्याचं उत्तर मला माहीत नाही. खरं तर मी कधी क्षणभरही विचार करीत स्वस्थ बसू शकत नाही, त्यामुळे हा संभ्रम, हा संदेह मला पेलवत नाहीय. त्यामुळे असेल कदाचित, मला स्वत:चा शेवट करावासा वाटतो.."
 त्या पत्रानं मी त्या वेळी कमालीचा अस्वस्थ झालो होतो. पपांनी जे अडखळत, त्यांच्याजवळ असलेल्या तोकड्या शब्दसंग्रहाचा वापर करून लिहिलं होतं, त्यापेक्षा त्यांना शेवटच्या क्षणी अधिक काही मला पत्रातून सांगायचं होतं. पण कदाचित त्यांचं त्यांनाच नीटसं उलगडत नसावं. मी त्यांच्या कबरीसमोर उभं राहून मनमुक्तपणे आसवं ढाळीत होतो. त्यांना जीवनाचा शेवट करताना जे प्रश्न सतावत होते, ते मला अकराळविकराळ स्वरूपात भयभीत करू लागले होते. मी कमालीचा संत्रस्त व संदेहित झालो होतो.

 पण त्यातूनही मी मार्ग शोधला. नेहमीप्रमाणं पांढ-यावर काळे करीत! त्यात सारे संत्रस्त सवाल विरघळून गेले. माझ्या पदरी आणखी एक वेगळी कादंबरी जमा झाली होती... "दि सटॅनिक हिरो(सैतानी नायक) जी पपांच्या जीवनाचा वेध घेणारी कादंबरी

लक्षदीप ॥ १८९