पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नालस्ती केली म्हणून धर्मनिष्ठ इस्लामींनी ठार मारावं असा ज्याच्याविरुद्ध हुकूमनामा काढला होता, त्या सलमान रश्दीलाही इंग्लंडनेच आसरा दिला होता. लेखन व विचार स्वातंत्र्य' या लोकशाही मूल्यांच्या आधारे त्याला आसरा मिळाला होता. त्या देशात माझ्यावर तसा बाका प्रसंग येणं शक्य नव्हतं. पण ख्रिश्चनांमधला एक फार मोठा धर्मनिष्ठ वर्ग मला सलमान रश्दीप्रमाणं धर्मद्रोही मानत होता हे मात्र खरं. त्याच पंथाच्या माझ्या आईनं चार दशकांपूर्वीच सैतानानं माझ्या अंतरात्म्याचा ताबा घेतल्याचं मानून मला घरातून बाहेर काढलं होतं.
 खरं तर, मी तिच्यासाठी कोणतेही धार्मिक विधी करू नयेत, असं मदर मेरीनं तिच्या मृत्युपत्रात स्पष्टपणे नमूद करून पुत्राचा अंतिम अधिकारही नाकारला होता. तो तिनं दिला होता माझ्या सावत्रभावाला. खरं तर, माझ्या वडिलांनी त्याच्या आईशी विधिवत विवाहही केला नव्हता, तसंच त्यांनी मदरला कधी घटस्फोट दिला नव्हता. खरं तर दोन ध्रुवांवर जगणारे ते दोन जीव तरुण वयात प्रेमात पडून एक झाले. पण त्यांच्यात बांधून ठेवणारा सहजीवनाचा एकही धागा नव्हता. तरीही पपांचं मदरवरील प्रेम अजब, अतार्किक होतं. मदरचं त्याबाबतचं स्पष्टीकरण तिच्या धर्मनिष्ठ विचारांचं द्योतक होतं, “अजूनही त्यांच्या मनात ख्रिस्त धर्माचा एक कोपरा शिल्लक आहे..." त्या पपांच्या विवाहबाह्य संबंधाचा मदरनं सदैव तिटकाराच केला होता. त्यासाठी त्यांना ती नेहमी शिव्याशाप देत आली होती. तरीही माझा पुत्र म्हणून अंत्यविधीचा अधिकार नाकारून विवाहबाह्य संबंधातून बापानं या दुनियेत आणलेल्या माझ्या सावत्र भावाला तो अधिकार मृत्युपत्रान्वये मदरनं देऊ केला होता. कारण तिची सवतही चर्चला नियमित जायची. मदरनं माझा आयुष्यभर दुस्वास केला, त्याची ही परिसीमा होती. तरीही तिच्या निधनाचे वृत्त कळताच मी माझी सारी कामं बाजूला सारून इथं आलो होतो. माझ्या त्या सावत्र भावाचे बेसुमार मद्यपानामुळे लिव्हर बिघडले होते. मरणासन्न अवस्थेत उपचार घेत असलेल्या धर्मादाय हॉस्पिटलमधून शोधून त्याला आणण्यात आलं. त्याच्या हस्ते मदरचे अंत्यविधी ख्रिस्ती धर्माप्रमाणं करून परत त्याला दवाखान्यात पाठवलं होतं.
 मदरच्या दफनविधीनंतरचा आजचा रविवार होता. तिला ‘संडे प्रेअर' फार प्रिय होती. इथं आल्यापासून मागील तीन दिवसात माझं मन हळुवार झालं होतं. माझं मलाच त्याचं नवल वाटत होतं. त्या भावविभोर अवस्थेनं मला आज थॉमस चर्चमध्ये संडे प्रेअरला येण्यासाठी मजबूर केलं होतं.

 त्या मदरसाठी माझी आजची संडे प्रेअर होती. जिचं मुख मी सोळाव्या वर्षी घर सोडल्यानंतर तिच्या कठोर आज्ञेमुळे जिवंतपणी पुन्हा कधीही पाहिलं नव्हतं. तिच्यासाठी आज मी मनापासून प्रार्थना करीत होतो. आजवर माझ्या आयुष्याला ज्याची कधीच जाणीव झाली नव्हती. अशी एक पवित्र, उदात्त भावना मला स्पशून जात होती. मदर

लक्षदीप ॥ १८१