पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे, तसंच माझ्यासाठी माझं लेखन! मी आजच हे घर व हे गाव सोडेन. तुला पुन्हा कधीही भेटणार नाही. नो, मदर नो! मला माझ्या लेखनाबद्दल उपरती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे वाट चुकलेलं लेकरू तुझ्याकडे परत येण्याचा संभव नाही..."
 मी घर सोडताना बोललेलं सारं काही मला आताही आठवत होतं. आता ती या जगात नाही आणि आपण आता खरंच या अफाट दुनियेत एकाकी, अनाथ झालोत ही जाणीव मन व्याकूळ करीत होती.
 त्यावेळचा मदरचा उदास, पुत्रवियोगाच्या जाणिवेनं खचलेला चेहरा मला आजही स्मरणात आहे. पण त्याच वेळी त्या चेह-यावर धर्मनिष्ठेची अविचल मुद्राही कोरलेली होती. सैतानानं आपल्या मुलाच्या मनाचा ताबा घेतला आहे व त्या असुरी प्रभावाखाली तो अनैतिक स्वरूपाच्या, हिंस्र उघड्या-वाघड्या जीवनाच्या अश्लील कथा लिहीत आहे. त्याच्या वियोगाच्या जाणिवेनं तिचं मातृत्व तीळतीळ तुटत असणार. पण तिचा जन्म हा तिच्या मते येशू ख्रिस्तासाठी आहे आणि त्या पवित्र जीवनाशी माझं वागणं, माझं लिहिणं सुसंगत नाही. मुख्य म्हणजे त्याबाबत मला जराही पश्चात्ताप होत नाही. धर्मभ्रष्ट झालेला मुलगा की, पवित्र धर्म? यामध्ये तिनं धर्माची निवड केली होती. म्हणून मला घर सोडणं भाग होतं.
 त्या घटनेलाही आता चार दशकं झाली. मीही आता वृद्धत्वाच्या दिशेनं वाटचाल करीत होतो.. स्वैर, बेबंद जीवनाचा परिणाम निसर्गानं दाखवायला केव्हाच प्रारंभ केला होता. अनेक व्याधींनी शरीर पोखरलं होतं. जीवन उपभोगण्याची आणि लेखनाची धुंदी ब-याच प्रमाणात ओसरली होती. पपांच्या जीवनाला केंद्रस्थानी ठरवून लिहिलेल्या बुकर विजेत्या ‘दि सटॅनिक हिरो' या कादंबरीनंतर गेल्या दीड वर्षात फारसे मनासारखं लिहून होत नव्हतं. जणू मी आजवर जे जीवन-तत्त्वज्ञान मनी बाळगून व त्यावर निष्ठा ठेवून जगलो, ते मला मनोमन कुठंतरी अपुरं व पोकळ वाटू लागलं होतं. ही जाणीव तशी अस्पष्टच होती. आज ती काहीशी तीव्र व नेमकी जाणवत होती. एवढंच!
 याचा कुठं तरी मदरच्या निधनाशी व माझ्या व्याधीनं घेरलेल्या शरीराशी संबंध आहे काय? मी कुठंतरी माझं जीवनतत्त्वज्ञान नाकारत तर नाही ना?

 छट.... मनात उठलेला हा तीव्र इन्कार मला क्षणभर उभारी देऊन गेला. हिंसा, सेक्स आणि क्रौर्य या आदिम मानवी वृत्तींचा वेध घेणारं लेखकीय जीवन ही माझी नियती होती. हे जग, ही उघडीवागडी दुनियाही तेवढीच खरी होती आणि साहित्य है। जीवनाचा आरसा आहे असं मानणारा मी, त्याचा माझ्या लेखनातून वेध घेत होता, धीटपणे अन पुर्ण ताकदीनं! ते लेखन इंग्रजी साहित्यात वादळ उठवून गेलं. माझ्या अनेक पुस्तकांवर अश्लीलतेचे खटले भरले गेले. चर्चनं त्या सैतानी कलाकृती म्हणून वाळीत टाकल्या. पण मी ग्रेट ब्रिटनचा नागरिक होतो. ईश्वराचा दुत मोहंमद पैगंबराचा

१८० ॥ लक्षदीप