पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३. सारांश


 "मदर, मी तुला दिलेलं वचन पाळलंय! त्या दिवसानंतर कधीही मी तुला माझं काळ तोंड दाखवलं नाहीय.' मी प्रार्थनेच्या वेळी मनोमन म्हणालो.
 आमच्या हाड घराण्याच्या अनेक पिढ्या ज्या चोवीस डिस्ट्रिक्ट' परगण्यात गुजरल्या, त्या प्रांतातल्या प्रसिद्ध सेंट थॉमस चर्चमध्ये मी आज कितीतरी वर्षांनी ‘संडे प्रेअर' च्या निमित्तानं आलो होतो. गेल्या आठवड्यात माझी आई मेरी मदर अल्पशा आजारानं निवर्तली होती. तिच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून मी आज चर्चमध्ये आलो होतो. पूर्णत: नास्तिक असलो तरी मन हळुवार व भावव्याकूळ झालं असल्यामुळे माझ्या मनानं हा निर्णय घेतला होता. त्याचीही उद्याच्या पेपरसाठी हेडलाईन होणार होती व आजच्या संध्याकाळच्या लोकल टी. व्ही. चॅनेलसाठी ‘ब्रेकिंग न्यूज' ठरणार होती. कारण या वर्षीच्या बुकर प्राईजचा मी विजेता लेखक होतो ना. पुन्हा माझी धर्म या संस्थेबाबतची परखड मतं जगजाहीर होती.
 “मदर, तुझ्या आत्म्याला कदाचित नवल वाटल असेल. सैतानानं ताबा घेतलेल्या तुझ्या या पापी लेकराला अवचित कशी उपरती झाली, असंही तुला वाटलं असेल!"
 त्या भव्य चर्चमधील मदर मेरीच्या व क्रूस वाहणा-या येशू ख्रिस्तांच्या तसबिरी पाहात होतो. पण मनमानसात माझी आई आठवत होती. माझ्या सावत्रभावाच्या जवळ असलेल्या अल्बममध्ये अलीकडचे मदरचे बरेच फोटो होते. पण त्या मदरला मी ओळखत नव्हतो. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी घर सोडताना पस्तिशीतली माझी तरुण आई माझ्या मनात होती. त्यानंतरच्या चार दशकात मी तिला कधी भेटलो नव्हतो की तिनंही कधी माझ्याशी संपर्क साधला नव्हता. तिचं धर्मनिष्ठ ख्रिस्ती मन तिच्या मातृत्वभावनेवर हावी झालं होतं, त्यानं मला तिच्या पवित्र धार्मिक जीवनातून कायमचं हद्दपार केलं होतं!

 "ठीक आहे मदर, तुझी हीच आज्ञा असेल तर तुझा पुत्र म्हणून मला तीही मान्य आहे. माझ्यासाठी ती फार कठोर सजा आहे, पण जसं तुझ्यासाठी धर्मजीवन महत्त्वाचं

लक्षदीप । १७९