पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पुन्हा एकदा तीच लक्षणं कमलमध्ये दिसू लागली. परकोटीची तीव्र निराशा, अलिप्ततेचं कवच चढवून स्वत:च्या कोषात बद्ध होणं, झपाट्याने काळवंडणारा चेहरा व झडणारी काया, तहान व भुकेची जाणीव न होणे... हीही एक प्रकारची आत्महत्याच होती. कणाकणाने, क्षणाक्षणाने होणारी. ती अजून जिवंत होती एवढंच.
 पुन्हा संदीप व बाबांनी तिला माहेरी आणून दवाखान्यात अॅडमिट करणं, डॉक्टरांची पुन्हा 'शॉकथेरपी', पुन्हा तिचं बरं होणं आणि नारायण सुर्त्यांच्या कवितेच्या आधारे मन पुन्हा सबल, कणखर बनविणं.
 “त्याच दिवशी मनाच्या एका कोन्या पानावर लिहिले,
 हे नारायणा, अशा नंग्या दुनियवेत चालायची वाट,
 लक्षात ठेव सगळ्या खाणाखुणा
 भेटला हरेक माणूस, पिता, मित्र, कधी नागवणारा होऊन
 रणरणत्या उन्हात डांबरी तव्यावर घेतले पायाचे तळवे होरपळून.
 आता आलोच आहे जगात
 वावरते आहे या उघड्या नागड्या वास्तव्यात
 जगायलाच हवे, आपलेसे करायला हवे
 कधी दोन घेत, कधी दोन देत.'
 आता कमल पूर्ण बरी झाली आहे. डॉक्टरांच्या विश्वासाच्या बळावर वाट पाहात दिवस घालवते आहे. श्रीकांत पुन्हा तिला घ्यायला परत येईल, पुन्हा एकदा राखेतून फिनिक्स पक्ष्यानं भरारी घ्यावी तशा जळून गेलेल्या सहजीवनाच्या मृगजळातूनही हिरवळ लसलसून वर येईल....
 संदीप आला तो तिची नजर चुकवीत, हातात एक नोटीस घेऊन. कमल बावरली, पण तिला जाणवलं, पूर्वीप्रमाणे हादरलो नाही आहोत. भयसूचक नांदी कानात वाजली तरी साहस पूर्णपणे तुटलेलं नाहीय, कदाचित विपरीत झेलायची सवय झाली असावी. तीव्र उदासीनता व तीव्र उत्तेजना जाणवत नाहीय. तरीही दोन्ही भावना फिकटपणे मनाला बिलगून आहेत.
 ती श्रीकांतची नोटीस होती. त्यानं तिच्याकडून डायव्होर्स मागितला होता. तिनं तो कागद नजरेसमोर धरला. जे त्या रात्री संपून गेलं होतं, त्याला फक्त कायदेशीर रूप द्यायचं होतं.

 डॉक्टरांनी तिला दिलासा दिला असला तरी मनोमन कुठे तरी त्यातली व्यर्थता वे खोटी आशा तिला कळली होती. कमलला वाटलं, आपल्या भावना, संवेदना का बोथटल्या आहेत? भारतीय विवाहित स्त्रीसाठी घटस्फोट म्हणजे जन्माचा पराभव, तो आता आपल्या समोर येऊन ठाकलाय. आयुष्य निरर्थक झाल्याची जाणीवही लखलखते आहे... तरी आपल्याला तीव्र निराशेने व उदासीनतेचे घेरलेले नाहीय. मुख्य म्हणजे

लक्षदीप । १७७