पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धर! तो येणार आहे तुला घेण्यासाठी. डॉक्टरांनी त्याला फोन केला आहे. ते माझ्यासारखा वेडीलाही प्रभावित करतात, तर श्रीकांत तर चांगला जाणता आहे... तो येईल, येणार आहे.."
 कमलला वाटलं, आपल्या सुरेल आवाजात गाणं म्हणून त्याला बोलवावे., *आ जा रे, परदेसी, मैं तो कबसे खड़ी इस पार..."
 श्रीकांत तिला म्हणायचा, “कमल, आता मी टेप विकन टाकतो, काय गरज आहे मला त्याची? मला गाणं ऐकण्याचा मूड आला की तुला बस् फर्माईश करणार... आणि माझी ही लता, अनुराधा पौडवाल छानपैकी गाणी ऐकवणार.. तीही माझ्या आवडत्या जुन्या हिंदी सिनेमांची."
 तिनं ट्रांझिस्टर ऑन केला. आकाशवाणी केंद्रावर ‘रामचरितमानस' सुरू होतं. त्यानंतरच्या बातम्या व सुगम संगीत ती आवर्जून ऐकायची.
 बातम्यांमध्ये परभणी येथे जानेवारीत भरणा-या अडुसष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कवी नारायण सुर्वे यांची निवड झाल्याची बातमी होती. कमल त्या बातमीनं हरखून गेली. तिच्या माहेरी, तिच्या आवडत्या कवीच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य संमेलन होणार होतं.
 पुढील बातम्या जणू तिच्या कानावर येत नव्हत्या. ती पाहता पाहता उत्तेजित झाली आणि दिवास्वप्नांचे सुरेख जाळे विणू लागली. घरी औरंगाबादेत श्रीकांतपुढे तिने लाडिक हट्ट धरला आहे व त्यानंही परभणीला संमेलनासाठी जोडीनं जायचं मान्य केले आहे. घरी बाबा व आई किती खुश होतील जावयाला लेकीसह पाहन, आईच्या वत्सल मिठीत शिरताना व बाबांच्या गळी पडताना हे खरं वाटत नाही की, मी त्यांची कन्या नाही. मला त्यांनी अनाथ आश्रमातून एक वर्षाची असताना आणली आहे. संदीपभय्याला बहीण हवी म्हणून.
 आणि पुन्हा एकदा उदासीनता तिच्या मनात घर करून गेली. श्रीकांत खरच मला घ्यायला येईल?
 “कमल, क्षणात उत्तेजित होणे व तितक्यात चटकन उदास होणं असा तुझा स्वभाव आहे. तुझा मूड कधी हर्ष तर कधी खेद यामध्ये हेलकावत असतो."
 डॉक्टरांचे शब्द तिच्या कानात घुमत होते व तिला स्वत:कडे डोळसपण पाहायला प्रवृत्त करीत होते.

 "अशा स्वभावाला आमच्या मानसशास्त्रीय भाषेत सायक्लोथायमिक व्यक्तिमत्व म्हणतात. तु इथं आलीस तेव्हा एम. डी. पी. म्हणजे मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिसचा शिकार झाली होतीस. यामध्ये टोकाचे विकृत औदासीन्य व टोकाची विकृत उत्तेजना माणसाच्या मनात आळीपाळीने येत असते... पण आता तुझी ती स्टेज संपली आहे. बेसिकली तुझ्या या दोन्ही भावना असंतुलित होण्याइतपत तीव्रतम नव्हत्या - नाहीत.

१७० । लक्षदीप