पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२. स्वत:लाच रचित गेलो आजची पहाट कशी कमलसाठी झिंग घेऊन आली होती. नेहमीपेक्षा लवकर तिला जाग आली होती. पण पूर्ण झोप झाल्यामुळे ताजेतवाने वाटत होते. रात्री, झोपेतही तिच्या नजरेसमोर तिचं हसरं घरकुल येत होतं. मधल्या काळात तिची मुळं त्या घरकुलातून उखडून टाकली आहेत या विदारक वास्तवाला तिच्या सुप्त मनानं विस्मृतीच्या दर्यात पार डुबवून टाकलं होतं. तिच्या अवघ्या अस्तित्वाचं केंद्रबिंदू असलेल्या घराच्या स्वप्नील स्मृतीनं आज उठल्या उठल्या मन उल्हासित झालं होतं. हवेत छानपैकी गारवा होता. म्हणून चूळ भरून ती आपल्या स्पेशल वार्डातून बाहेर आली व दवाखान्यासमोरील बागेत फेरफटका मारू लागली, तिचं मन काहीसं उत्तेजित झालं होतं. मागे काही वर्षांपूर्वी बदलून आलेल्या एका फुलवेड्या डॉक्टरमुळे त्या इस्पितळात छानपैकी बाग विकसित झालेली होती. कमलचा आवडता पारिजात मंदपणे दरवळत नाजूक सुकुमार फुलांचा सडा शिंपीत होता. पक्ष्यांचा मधुर किलबिलाट मन प्रमोदित करीत होता. तिने खाली वाकून ओंजळभर फुले वेचून त्याचा ताजा सुवास रंध्रारंध्रात भरून घेतला. तेव्हा तीव्रतेने तिला गावंसं वाटलं, अचानक तिच्या ओठावर एक परिचित गाण्याची लकेर आली. “मिल गये मिल गये आज मेरे सनम आज मेरे जमीपर नही है कदम ।” ती खुदकन हसली. आज नक्की श्रीकांत आपल्याला घ्यायला येईल. आपण पूर्ण बरे झालो आहोत. त्या नव्यानं रुजू झालेल्या ऑनररी डॉक्टरनं त्याला स्वत: फोन केला होता. ती ते गाणं गुणगुणत आपल्या रूमकडे वळली, तेव्हा सनईचे मंगल सूर काना पडले. त्या नव्या डॉक्टरांची ही कल्पना होती. रोज ते सकाळी व दिवसाच्या विविध प्रहरी त्या त्या प्रकारचे राग असलेले वाद्यसंगीत लावत. त्यामुळे रोग्याच्या मनावर अनुकूल परिणाम होतो म्हणे. १६८ ॥ लक्षदीप