पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तकलादू असलं तरी अर्थपूर्ण करणारं! ते मी खच्ची केलं..... मला माफ कर, माफ कर!"
 तो गाभा-यातून बाहेर आला, तसे त्याला मास्तर सामोरे झाले. त्यांच्या हातात सहा महिन्यांचं एक बालक निरागसपणे हसत मस्ती करीत होतं.
 “साहेब, तिकडं मोरया गोसावीनं जलसमाधी घेतली व इकडे याचा जन्म झाला. माझी लेक सुखरूप बाळंत झाली. त्याचं नाव मी मोरया ठेवलं आहे. साच्या गावाला, आणि खोटं कशाला सांगू, विज्ञानाचा शिक्षक असूनही या गावात जन्म गेल्यामुळे मलाही वाटलं, नव्हे, आता ती आमची अभंग श्रद्धा बनली आहे की, मोरया गोसावीनं याच्या रूपानं पुनर्जन्म घेतला आहे."
 अवाक् होऊन अक्षय ऐकत होता!
 गावात कुणी मरणाच्या वाटेवर असला की मला सांगावा येतो. मी या चिमुकल्या मोरयाला तेथे नेतो. त्याचे हात त्या मरणाच्या माणसाच्या चेहे-यावरून फिरवतो... आणि नवल म्हणजे, तो माणूस शांतपणे मृत्यूला सामोरा जातो. माणूस कसाही जगू शकतो साहेब, पण मरताना बळ हवं. ते तेव्हा मोरया गोसावी द्यायचा व आता बाळाच्या रूपानं पुनर्जन्म घेऊन पुन्हा तोच देतोय - आम्हा तामुलवाडीकरांना त्याचीच तर गरज आहे..."
 परभणी व तिथून मुंबईला जाताना अक्षय स्वत:ला एकच बजावत होता. “हे सारं तुला एक निरर्थक, बेमतलबी स्वप्न म्हणून विसरून जायचं आहे. त्याचा जिवाला त्रास करून घ्यायचा नाही. आणि त्याबाबत प्रश्न विचारून स्वत:ला घायाळ करून घ्यायचं नाही...
 अंडरस्टॅड?”

० - ० - ०

लक्षदीप । १६७