पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जिल्ह्याच्या - राज्याच्या विकासप्रक्रियेत जणू तामुलवाडीचं नामोनिशाणही नव्हतं!
 "साहेब, जन्माला आलं की मरेपर्यंत जगावं लागतंच - मग ते जगणं किती का कठीण असेना!” सरपंच म्हणाला, “सतत मृत्यूच्या छायेत जीव मुठीत धरून वावरावं लागतं. अशा वेळी एकच सहारा आहे - नदीकाठचं महादेवाचं देऊळ! आमच्या जीवनमरणाचं सारं ओझं - भार त्याच्या चरणी अर्पण करतो... आणि तो मोरया गोसावी - कोठून आला देव जाणे, पण त्याची प्रार्थना - त्याची पूजा आम्हाला धीर देते - जगायचं बळ देते! तो काही फारसा बोलत नाही. अडल्या - नडल्याच्या घरी - त्याला कसं समजतं माहीत नाही - अचूक येतो, देवाचं भस्म लावतो; अंगावरून - मस्तकावरून शिवशंभो हर-हर करीत हात फिरवतो... आणि मग येणार मरणही सुखानं - शांतपणे येतं, साहेब-"
 अक्षय चांगलाच बुचकळ्यात पडला होता. मोरया गोसावी हा खरंच जिवंत खराखुरा माणूस आहे का श्रद्धा-धैर्याचं प्रतीक? गावक-यांनी त्यांच्यासाठी निर्माण केलेलं प्रतीक - मिथक?
 “पुरामुळे तामुलवाडीत दोन दिवस आमदार अडकून पडले" अशी खमंग बातमी या काळात वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. नदीचा पूर ओसरण्याचा वेग मंद होता, त्यामुळे आमदार व तहसीलदार हे तामुलवाडीत कमालीचे बोअर होत पाटलाच्या वाड्यात आराम करीत होते.
 अक्षय मात्र चळ लागल्याप्रमाणे वाडीत भिरभिर हिंडत होता. प्रत्येक घरात जात होता. लोकांशी बोलत होता, त्याहीपेक्षा जास्त ऐकत होता. त्याला त्यांच्या प्राप्त परिस्थितीतही चिवटपणे जगण्याचा पीळ शोधायचा होता आणि निलेपपणे मृत्यूला सामोरं जाणाच्या वृत्तीचंही रहस्य जाणून घ्यायचं होतं! त्याचा हा शोध पुन्हा पुन्हा नदीकाठचं पुरातन शिवमंदिर आणि निस्संग अवलिया मोरया गोसावीपाशी येऊन थांबत होता. पण मोरया गोसावीचं मौन आणि शून्यवत नजर त्याला अनाकलनीय वाटत होती! प्रसंगी चीड यावी इतपत अलिप्त व कोरडी वाटत होती.
 पण ती फोल आहे हे अक्षयला जाणवलं ते त्या दुपारी वाडीच्या एका तरण्याताठ्या शेतक-याच्या मृत्यूनं. दुपारी अक्षय शिवमंदिरात भिंतीला टेकून पहुडला होता आणि मोरया गोसावी पद्मासनात समाधी लावून बसलेला. ओठातून घुमणारे शब्द येत होते, “शिव शंभो हरहर - शिवशंभो!"

 अभय त्याचा डोळे मिटलेला चेहरा एकटक पाहात होता. त्याला तो वाचायचा होता; पण मनातलं त्यावर काही उमटलेलं दिसत नव्हतं! हीच तर कर्मयोगी अवस्था नाही? कसलीही अपेक्षा न करता जगण्याचं एकदा साधलं की आपल्या आधुनिक जगातले जगण्याचे सारे संदर्भ व प्रेरणा, स्पर्धा, संघर्ष आणि चंगळवादी शैलीचं जगण

१६ ० ॥ लक्षदीप