पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मात्र समई थरथरत का होईना, तेवत क्षीण प्रकाश देत होती.
 केव्हातरी मध्यरात्री मोरया गोसावी निद्राधीन झाला होता. झोपेतही तो ‘शिवशंभो’ असं पुटपुटत होता...
 अक्षय लख्ख जागा होता. देवळाचं प्रशस्त आवार, सभोवती गाभा-यातून येणाच्या थरथरत्या प्रकाशात गर्दतमाची तीव्रता त्याला अधिकच जाणवत होती. त्याची झोप साफ उडाली होती. खरं तर काल दुपारपासून अवघी तामुलवाडी तुडविल्यानंतर अंतर्बाह्य चिंब भिजलेल्या अक्षयचा तरुण देह थकला होता. ओली झालेली जीन्स पॅट अधिक जड झाली होती... शर्ट अंगाला चिकटला होता आणि हुडहुडी भरवीत होता.
 त्याच्या मनात अनेक प्रश्नांचे तुफान उठलेलं.... आपण इथं काम करीत आहोत, आपलं मुंबईचं सुरक्षित आयुष्य सोडून. पवईला आय. आय. टी. मध्ये बी. टेक. होऊन एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत जॉब घेण्याऐवजी राज्य शासनाच्या अभियांत्रिकी सेवेत कार्यकारी अभियंत्याची नोकरी स्वीकारलेली - प्रशिक्षणाच्या कालावधीत साहाय्यक अभियंता म्हणून परभणीस आलो... व या मध्यरात्री या पुराने वेढलेल्या तामुलवाडीत देवळात खाटेवर पडून जे अनुभवीत आहोत, ते आपल्या कॉन्व्हेंट प्रशिक्षित हाय सोसायटीतल्या मित्रांना मुंबईत परतल्यावर सांगितलं तर ते विश्वास ठेवणार नाहीत...
 खराखुरा अस्सल भारत - खेडेगावांचा भारत असाच आहे का? या तथाकथित प्रगतीशील महाराष्ट्रात अशी तामुलवाडी असेल तर बिहार - उत्तर प्रदेशाची काय स्थिती असेल?
 तो पुन्हा पुन्हा आपलं मुंबईचं मरीन ड्राईव्ह - कफ परेडचं ए. सी., वॉल टू - वॉल कार्पेटचं संपन्न, चंगळवादी उपभोगाचं जीवन आणि ग्रामीण महाराष्ट्राचे विदारक प्रतीक असलेल्या तामलवाडीचं काल दुपारपासून पाहात असलेलं अभावाचं आणि निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेलं कुंठित-गतानुगतिक जीवन यांच्यातला कॉन्ट्रॉस्ट शरमिंद्या मनानं, स्वत:ला अपराधाची टोचणी लावीत तपासत होता आणि अस्वस्थ होत होता...
 म्हणूनच त्याला झोप येत नव्हती. आणि नजर समोरून वाहणाच्या अंधारातही लाल पाण्याचे रंग अंगांगावर अनाम व खोल भीती उठवीत वाहणा-या नदीवर खिळलेली होती.... आपण या गावचे, या लोकांचे काही देणे लागतो का? आर वुई विलाँग टू अनदर प्लॅनेट... अनदर अर्थ?
 आणि त्याच्या कानावर शिवस्तुतीचे शब्द आले. अक्षय त्या अंधाराच्या पोकळीत खणखणीत, भक्तीभिजल्या स्वरात ऐकू येणा-या नादपूर्ण शब्दांनी रोमांचित झाला. मोरया गोसावी नदीकडून येत होते व शिवस्तुती म्हणत होते.

कैलासराणा शिवचंद्र मौळी ।

लक्षदीप । १५३