पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भ्रष्टाचाराची गंगोत्री जर राजकारण असेल तर तेच क्षेत्र प्रथम बदलणं आवश्यक आहे. म्हणून मी राजकारण जॉईन करणार आहे."
 “पण तुम्ही त्याच सिस्टिमचा भाग बनणार नाहीत कशावरून? कारण आजचं राजकारण म्हणजे पैशाचा खेळ. सरपंचपदावर निवडून येण्यासाठी सुद्धा हजार - लाखात खर्च येतो, म्हणून विचारलं."
 “वेल, मी सिस्टिमविरुद्ध अखेरपर्यंत लढेन की, त्या सिस्टिमचा काही दिवसांनी एक भाग बनेन हे मला आज सांगता येणार नाही, एवढंच मी या क्षणी प्रांजळपणे कबूल करतो!"
 मनोमन त्यालाच आपला भरवसा वाटत नव्हता. कारण अभावाच्या जिंदगीमुळे पैशाचं महत्त्व तो जाणत होता. अर्थात इज्जतीनं पैसा कमवावा म्हणून तारुण्याची चार वर्षे त्याने अभ्यासात घालवली होती. पण आता सारं संपलं होतं. राजकारणाची वाट त्याला खुणवू लागली हेती. तिथं आपली डाळ शिजेल का? निभाव लागेल का? हे प्रश्न आज तरी अनुत्तरित होते.
 राजकारणातील तडजोडीचं काय? त्या करताना मोहाच्या वाटा लागल्या तर आपण काय करू? ठामपणे आपण स्वच्छ राहू असं आपलं मन का ग्वाही देत नाही? हा सवाल व ही सल त्याला व्याकूळ करीत होती!
 “मी मात्र एकदम ड्रास्टिक अॅक्शन घेणार आहे." नेहा तिच्या नेहमीच्या आक्रमक सुरात म्हणाली. त्याबरोबर हॉलमध्ये शांतता पसरली. साच्या पत्रकारांच्या नजरेत कुतूहल व औत्सुक्य दाटून आलं होतं.
 “मी, ही नेहा, नक्षलवादी बनणार आहे." तिनं सावकाश पण ठामपणे एका एका शब्दावर जोर देत म्हटलं आणि साध्या मीडियाला उद्याची हेडलाईन व ब्रेकिंग न्यूज सापडली.
 “होय, मी पूर्ण विचारांती बोलले आहे. मी नक्सलाईट मूव्हमेंट जॉईन करू इच्छिते. मला माहीत आहे की, आज अनेक राज्यात तिच्यावर बंदी आहे. नक्षलवादी उग्र व हिंसक आहेत. पण ते या अन्यायग्रस्त करप्ट सिस्टिमविरुद्ध लढा देत आहेत हे महत्त्वाचं. आज देशाच्या एकतृतीयांश जिल्ह्यांमध्ये त्यांची चळवळ पसरली आहे. हे कशाचं द्योतक आहे? हजारो तरुण - तरुणी, सुविद्य लोक त्यांना सामील होत आहेत, ते कशासाठी? ही हँव' आणि 'हॅव नॉट' ची लढाई आहे. देशावरील करप्शनचा डाग मिटवायचा असेल तर जालीम उपायांची गरज आहे. तो उपाय माझ्या मते नक्षलवादी चळवळ हा आहे. चारू मुजुमदारांचा आदर्श मला मोह घालतो... आय वॉट टू बी लेडी चारू मुजुमदार अॅड वाँट टू चेंज द होल सिस्टिम!"

 प्रेस कॉन्फरन्स संपली होती. सारे जण निघून गेले होते. तिघांच्या तीन भिन्न प्रतिक्रियांनी सूर्यवंशी हादरून गेले होते. त्यांच्यातला आदर्शवादी माणूस घायाळ

लक्षदीप । १४९