पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राहिले. नंदिताच्या चेह-यावर पत्रकारांच्या व टी. व्ही कॅमे-याच्या नजरा खिळल्या होत्या. कदाचित तिला या प्रश्नाची अपेक्षा असावी. ती शांतपणे उत्तरली.
 होय, हे खरे आहे. काही दिवसात मला चार्ज सोडावा लागणार आहे. पण त्याचा संबंध तुम्ही पोलीस केसशी का जोडता हे मला कळत नाही. ही रुटीन बदली आहे."
 उद्या तिच्यावर शिस्तभंगात्मक कार्यवाहीची पाळी आली तर तिनं बचावासाठी हे प्रतिपादन केलेलं होतं.
 "पण त्या पोलीस केसचं काय?"
 "ती चालू राहीलच की आणि मला जेव्हा चौकशीला बोलवतील तेव्हा मी जाईन आणि सत्य काय ते सांगेनच. आता मी त्या सिस्टिमच्या बाहेर आहे. चौकशीत सा-यांनीच सर्व काही खरं सांगायचं असतं, या तत्त्वानं मी सारं खरं मला माहीत असलेलं पुराव्यासह सांगेन आणि बाहेरून सिस्टिम बदलण्यासाठी माझं योगदान देईन!”
 पत्रकारांना छानपैकी बाईट्स मिळत होत्या. तिच्या बदलीची ब्रेकिंग न्यूजही मिळाली होती.
 “एकूण तुम्ही सिस्टिमशी बाहेरून व सूर्यवंशी सर, तुम्ही सिस्टिममध्ये राहून सिस्टिमशी लढणार आहात. या दुहेरी लढाईचा चांगला परिणाम पाहायला मिळेल अशी अपेक्षा जनतेनं करावी का?"
 “कदापि नाही!" आवाजाच्या दिशेनं पत्रकारांच्या नजरा व कॅमे-याची लेन्स वळली. तो सिद्धार्थ होता. “वुई हॅव नो होपस्. ही सिस्टिम चिखल झाली आहे. सर व मॅडम त्यात उमललेली दोन कमलपुष्पे आहेत. त्यांना या सिस्टिमनं त्या चिखलातच गाडू नये म्हणजे मिळवली!”
 “आय टोटली अॅग्री वुईथ सिद्धार्थ." नामदेव म्हणाला, “आम्ही खप विचार केला आहे. एम. पी. एस. सी. चा भ्रष्टाचार हा एकूण भ्रष्टाचाराच्या हिमनगाचां एक अंश आहे. उजेडात आलेला. इथून तिथून साच्या राजकीय व सामाजिक जीवनाला भ्रष्टाचाराच्या ऑक्टोपसनं विळखा घातलाय. नथिंग विल हॅपन. धिस कंट्री हॅज रिअली नो फ्यूचर - अॅटलिस्ट फॉर गुड अँड ऑनेस्ट पीपल!”
 “सर नेहमी म्हणतात की, गुड करन्सी कॅन ड्राईव्ह आऊट बॅड करन्सी, पण मी ठामपणे सांगते की, इथं बँड करन्सीच आहे सर्वत्र. ती आपल्या पाशवी सामथ्र्यानं नंदिता मॅडम व सूर्यवंशी सर नामक गुड करन्सीला बाहेर काढून त्यांची बदनामी करीत त्यांनाच बाद करतील." नेहा म्हणाली, “त्याची सुरुवात नंदिता मॅडमच्या बदलीनं झालीच आहे."

 तिथे थेट मझ्याचं बोलणं सूर्यवंशींना मनस्वी भिडलं होतं. त्यांच्या मनातल्या

लक्षदीप । १४७