पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पी. एस. सी. चे सदस्य आहात. सर्वात ज्येष्ठ आहात. कदाचित आता चेअरमनही व्हाल. तुम्हाला विशेष लक्ष घालून युवकांना जामीन देऊन का सोडावंसं वाटलं?"
 क्षणभर ते थांबले. चेह-यावर फ्लॅशच्या प्रकाशात पडलेला ताण जाणवावा एवढा त्यांचा चेहरा पारदर्शी व स्वच्छ होता. तो त्यांना लपवायचा पण नव्हता.
 “वेल, मी एम. पी. एस. सी चा सदस्य आहे. म्हणून मला परीक्षार्थी युवकांची काळजी केली पाहिजे. त्यांच्या भवितव्याशी खेळायचा आम्हाला अधिकार नाही."
 पण सर, गेल्या दोन परीक्षांचा तीन वर्षांपासून निकाल नाही. एकाच वर्षी एकाच घरची तीन भावंडं डी. वाय. एस. पी. होतात आणि त्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल झालीय.. ही सारी उदाहरणं हे दाखवतात की, एम. पी. एस. सी. युवकांच्या जिवाशी बेपर्वाईनं खेळत आहे, नाही का?”
 सूर्यवंशींनी उत्तर देण्यापूर्वी उत्स्फूर्तपणे सिद्धार्थ बोलून गेला, “नक्कीच, आमचा हाच तर आक्षेप आहे. तो आम्ही त्या माजी कुलगुरूंना काळे फासून व्यक्त केला आहे. आमची तक्रार सरांपुढे लेखी नोंदवली आहे."
 “जस्ट इमॅजिन! नामदेव दुजोरा देत म्हणाला, “तुमच्याही घरात कदाचित आमच्या वयाची भावंडे, मुलं असतील, तीही कदाचित आमच्यासारखी शासकीय अधिकारी बनायची स्वप्नं पाहत अभ्यास करीत, तारुण्याची तीन - चार वर्षे रात्रीचा दिवस करीत असतील. त्यांची निराश मानसिकता, त्यांची घालमेल व अंतरीचा उद्रेक जाणायचा प्रयत्न करा. मग तुम्हाला कळेल, आम्ही किती व काय काय सोसत आहोत ते. चार दिवसांपूर्वीची आमची काळे फासण्याची कृती ही त्याचा एक उद्रेक होता. ती त्या एका आततायी क्षणाची उत्स्फूर्त व संतप्त प्रतिक्रिया होती, बस्! "
 त्या दोघांना इशा-यानं थांबवत सूर्यवंशी म्हणाले, “मी त्यासाठी प्रयत्न करतोय. मी इथं जॉईन होताना एका मिशननं आलो होतो. आणि पहिल्या दिवसापासून हे दोन वर्षांचे रखडलेले निकाल तयार करून घेण्याचा प्रयत्न केला. आता ते तयार आहेत."
 “पण एम. पी. एस. सी. मधला भ्रष्टाचार, सावळा गोंधळ? त्याचं काय?"
 मान्य की, पुरी यंत्रणा अलीकडच्या काही काळात सडली आहे. ती दुरुस्त करायची आमची जबाबदारी आहे. सिस्टीममध्ये राहूनच सिस्टीम बदलण्याचं हे काम करायचं आहे!”
 आता प्रश्नांचा ओघ नंदिताकडे वळला. एका शोधक पत्रकारानं प्रश्न विचारून चक्क बॉम्बगोळाच टाकला. “तुम्हाला यासंदर्भात काही प्रश्न विचारण्यापूर्वी एक उत्तर द्या. तुमची बदली एम. पी. एस. सी. च्या सचिवपदावरून शासनानं परत मंत्रालयात पशुसंवर्धन विभागात केली आहे. तुम्ही त्या तीन डी. वाय. एस. पी. भावांच्या संदर्भात पोलीस केस केल्यामुळे, हे खरं आहे काय?"

 सूर्यवंशी व ते तिघे हे ऐकून चकित झाले. नंदिताकडे अविश्वासानं पाहतच

१४६ । लक्षदीप