पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 सूर्यवंशींच्या लाल दिव्याच्या व्हाईट अॅम्बेसेडर कारमध्ये मागच्या बाजूला सरांसोबत सिद्धार्थ व नामदेव बसले, तर पुढील सीटवर नेहा. मुंबईच्या मरीन ड्राईव्हवरून वेगानं पळणाच्या कारमध्ये बसलेले असताना तिघांच्या मनात व नजरेत पुन्हा पुन्हा आपण कधी काळी असेच बड़े अधिकारी होऊ ही पाहिलेली स्वप्नं व त्याचं एका ध्यासपर्वात रूपांतर झालेलं स्मरत होतं. मग आता ती स्वप्नं उद्ध्वस्त झाल्याची जाणीव मनाला ऑफिस सीलच्या लाखेच्या तप्त मुद्रेप्रमाणे भाजत होती. ए. सी. कारची थंड हवा त्यावर दिलाशाचं मलम लावायला असमर्थ होती.
 सूर्यवंशींच्या हाजीअलीच्या सरकारी क्वार्टर्सचा दिवाणखाना, पत्रकार व चॅनेलवाल्यांनी खच्चून भरलेला.
 सूर्यवंशी सरांच्या स्टडीरूममध्ये नंदिता त्यांची वाट पाहात होती. सर बेडरूममध्ये तयार होऊन अस्वस्थपणे येरझाया घालीत होते. या तीन पोरांना प्रेसपुढे उभं करणं चुकीचं तर नाही? ती खोचक प्रश्नांना उत्तरं देताना भाडभाड बोलते सुटली तर? पण आता तीर तर सुटलेला होताच. आपणच प्रेस व चॅनेलवाल्यांना आजचं आमंत्रण दिलंय. समजा, दिलं नसतं तरी त्यांनी तिघांना एकत्र वा एकेकटं गाठलंच असतं! त्यामुळे हे तर अपरिहार्यच होतं.
 पण आपल्याला कशाची भीती वाटतेय? काल पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या बोलण्यात काहीतरी डास्टिक केलं पाहिजे' असा जो निर्वाणीचा सूर होता, त्याचं तर भय वाटत नाही?
 आपण का एवढे या तिघांत गुंतून पडलो आहोत, असा प्रश्न विचारला तर काय उत्तर द्यायचं?
 सिद्धार्थ व नामदेव रात्रभर एकत्र बोलत होते. स्वत:ला मोकळे करीत होते. दुस-या बेडरूममध्ये एकटी झोपलेली नेहाही रात्रभर लख्ख जागी होती. पहाटे डोळा लागत होता; पण निद्रावस्थेतही मनात विचारांचं तेच तुफान होतं. तिच्याकडे जेव्हा नामदेव व सिद्धार्थ आले तेव्हा तिला थोडं हायसं वाटलं. एक फिकट स्मित करीत तिनं त्याचं स्वागत केलं. तिघेही काही न बोलता खाली स्टडीरूममध्ये आले.
 नंदितानं विचारलं, “कसे आहात तुम्ही तिघे?"
 केवळ ओळखीचं स्मित देत तिघं म्हणाले, “ओ. के. मॅम..."
 काही क्षणात सूर्यवंशी आले. ते म्हणाले, "चला, सारा हॉल खचाखच भरलाय. मला एवढंच सांगायचं आहे पोरांनो, चॅनेलवाल्यांपुढे संयमित प्रतिक्रिया द्या..."

 सूर्यवंशींच्या अपेक्षेप्रमाणे पहिला प्रश्न त्यांनाच विचारला गेला. “तुम्ही एम.

लक्षदीप । १४५