पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०. ‘लाईफ’ ‘टाईम'चा ‘फॉर्म्युन


 }"तुमची बेल झाली आहे. चला, ऑफिसला चला!"
 केवळ दोन दिवस व तीन रात्रीची पोलीस कस्टडी, पण हा काळ किती प्रदीर्घ वाटत होता! जणू तो थबकलाय. पुढे सरकत नाहीय. मन दाट निराशेनं भरून गेलेलं. अख्ख्या जगाला आपल्याशी काही देणं-घेणं नाही. बेकारीचा शाप काय असतो हे। लख्खपणे जाणवतंय, त्या व्हाईट कॉलर तरुणांच्या भवितव्याशी खेळू पाहणाच्या नराधमाच्या तोंडाला काळे फसलंय. त्याचा तो तुपकट, गलेलठ्ठ व पैशानं माजलेला चेहरा साबणानं धुऊन एव्हाना पूर्ववत झालाही असेल, पण आपल्या मनात साचलेल्या काळोखाचं काय? तीन रात्रीच्या पोलीस कस्टडीत विविध गुन्ह्यांखाली कैद करून आणलेल्या समाजाच्या विविध स्तरातील गुन्हेगारांच्या संगतीत तो अधिकच दाट झालाय!
 सिद्धार्थ बोलत होता आणि नामेदव चूप होता. तीन रात्री व दोन दिवस, फक्त अधून मधून दोस्ताला बरं वाटावं म्हणून तो प्रतिसाद देत होता, पण त्याची अशब्द व अव्यक्त व्यथादेखील तीच होती.
 आपण बेकार आहोत. अगदी ठार बेकार! नोकरी मिळत नाही म्हणून बेकार तर खरेच, पण जगायलाही बेकार आहोत.
 या जेलनं ती भावना अधोरेखित झालीय. मुद्रांकित, अधिक गडद.

 दोघांनी मनोमन ठरवलेलं आहे की, आपण जामिनासाठी प्रयत्न नाही करायचा. त्यासाठी कुणाशीही संपर्क साधायचा नाही. बाहेर येऊन तरी काय करणार आहोत आपण या दुनियेत? आजवर एक स्वप्न होतं - उत्तम करिअरचं. उज्ज्वल भवितव्याचं. आपल्याला अंमलदार व्हायचं होतं. सनदी अधिकारी. आता ते चकनाचूर झालं आहे. आता कदाचित.... कदाचित काय, नक्कीच कधीही ते साकार होणार नाही. कारण आपल्या नावावर आता गुन्ह्याची नोंद आहे. सरकारी नोकरीत नियुक्तीच्या वेळी निष्कलंक जीवनाचा, कोणताही गुन्हा दाखल नसण्याचा दाखला लागतो. आपल्याला या जेलमुळे यापुढे तो कसा मिळेल?

लक्षदीप । १३९