पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माझे कोच आणि फ्रेंड, फिलॉसॉफर व गाईड आहेत. महाभारतात द्रौपदीचा श्रीकृष्ण जसा सखा होता, तसा सखा. आमचं नातं असेल तर मानसिक आहे.”
 पण आपल्या गावापलीकडं जग नसलेल्या त्या बालाजीला हे कळण्यापलीकडचं होतं. उगीच मी हे बोलून गेले सर. त्याच्या व माझ्यात केवढं अंतर आहे. सर्वच बाबतीत. किती व कशी जुळवून घेऊ? फार त्रास होणार आहे. खूप कठीण जाणार आहे; पण लग्नगाठ पडली आहे. तर निभावली पाहिजे.
 माझ्यात तेवढं बळ, तेवढी सोशीकता आहे? वेलीसारखी? आय डाऊट."
 पण.... म्हणूनच बालाजीनं आपण तिला भेटायला गेलो असताना तमाशा केला होता. बेबीशी चार शब्द बोलताही आले नाहीत. तिचा केविलवाणा चेहरा मनात रुतून बसला होता. तिची, तिची व आपली शेवटची भेट... तो विदीर्ण चेहरा इंगळ्याप्रमाणे डसतो. आपण तरी अशा परिस्थितीत काय करू शकत होतो?
 “गुरू, मला खरंच सहन नाही होत हो. हा माझा नवरा आहे की माझ्या मुलीच्या जिवावर उठलेला सैतान? मला धमकावतोय, ऑर्डर देतोय.. उद्यापरवा दवाखान्यात जाऊन गर्भपात करून घ्यायचा. कारण? पोटात वाढणारा गर्भ मुलीचा आहे....
 आणि त्यानं मला लग्नाच्या वेळी दिलेलं वचन खोटं होतं, त्याला माझ्या अॅथलेटिक्समधल्या करिअरची तिळमात्रही फिकीर नव्हती. पुढील महिन्यात ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी चाचणी स्पर्धेमध्ये माझी भारतीय संघात निवड होण्याचा चान्स होता. ही माझ्यासाठी केवढी मोठी अचिव्हमेंट ठरली असती..... पण बालाजी नवरा होता. खराखुरा. त्याला बायकोची कीर्ती व पराक्रम खुपत होता.
 लग्नाच्या पहिल्या रात्रीचं त्यानं सांगितलं होतं, ‘आता संसार पहिला महत्त्वाचा. आमचं खटलं (आमच्याकडे बायकोला खटलं म्हटलं जातं सर) आमच्या घरात राहावं. बाहेर मिरवून खानदानाच्या अब्रूची वाट लावू नये.' मी त्यावेळी फारसं मनावर घेतलं नाही.
 आगामी क्रीडास्पर्धेच्या दृष्टीनं शरीरसंबंधातून गर्भधारणा तूर्त होऊ नये म्हणून मी त्याला कंडोम वापरायचा आग्रह धरला; पण त्याच्या विकृतपणाचा नमुना पाहा. तो म्हणाला.
 "मी काही छिनाल नाही. कुण्या वेश्येकडे गेलो नाही. मला कंडोम वापरायला सांगतेस? तुला एड्स नाही होणार."
 "पण धनी, मी काय म्हणते..."
 काही बोलू नकोस, कंडोमनं मला मजा नाही वाटणार."
 तेव्हा मी ओरल पिल्स घ्यायला सुरुवात केली. त्याला त्याचा सुगावा लागताच त्या गोळ्याचं पाकीट फेकून दिलं व मला शेजेवर फेकीत म्हणाला.

 मला बाप व्हायचंय. आज मी तुला सोडणार नाही. साली."

लक्षदीप १३५