पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 गुरूनं त्या फोटोवर ओठ टेकवले... तिनं त्यावेळी जसे त्याच्या डोळ्यांवर अश्रूकण टिपण्यासाठी टेकवले होते. ‘जो बात तुझ में है, तेरी तसबीर में नहीं.' हेच खरं, आपण तिला शेकहॅण्डखेरीज कधीच स्पर्श केला नाही. त्यावेळी तिनं मिठी घातली तोच एकमात्र स्पर्श. त्यावेळीही आपण संकोचानं तिच्या पाठीवर हात फिरवत असल्यामुळे तिच्या स्पर्शाची शरीराला सोडा, मनालाही पूर्ण जाणीव झाली नाही. त्याक्षणी आपल्याला आपलं दलितपण का आठवत होतं? आपण का आक्रसत होतो? या प्रश्नांपासून आपली सुटका व्हावी म्हणून त्यानं डायरीचं पहिलं पान उघडलं. त्यावर शीर्षक होतं. 'आज मला गुरू भेटला!'
 "आज मला गुरू भेटला! बाजारात अचानक पाठीमागून कुणीतरी आलं आणि हातातली पर्स हिसकावून घेतली. क्षणात जाणीव झाली की, तो चोर आहे. मी त्याचा पाठलाग करू लागले, पण वाटेत गुरूना, तेव्हा ते अजनबी होते, धडकले. त्यांना पळणा-या चोराकडे बोट दाखवत म्हटलं. त्याला पकडा.' ते म्हणाले, 'तुला चांगले पळता येतं. पळ, मीही सोबत आहे. तूच त्याला पकडायचं. तुझा वेग कमी पडला तर मी त्याला पकडेन. आय अॅम रनर.' मला कसली तरी अनामिक स्फूर्ती चढली. मी सुसाट पळत त्या चोराचा पाठलाग करू लागले. गुरूही माझ्या बरोबरीनं पळत होते. आणि म्हणत होते रन बेबी रन!' पण माझी ताकद संपुष्टात येत होती. वेग कमी होत होता. तेव्हा त्यांनी धावून पुढे जात त्या चोराला पकडलं आणि माझी पर्स मिळवली. तोवर मी तिथे पोहोचले होते. त्यांनी चोराला दोन लाथा देत म्हटलं, ‘मघाशी जेवढ्या वेगानं पळालास, त्याहून जादा वेगानं पळत इथून सुटायचं, नाही तर पोलिसांत देईन तुला..."
 कुल्ल्याला पाय लावत तो भेकड पळून गेला.
 मी गुरूचे आभार मानले. तेव्हा ते म्हणाले, "नुसत्या आभारानं काम नाही चालणार. बक्षीस हवं.”
 मी म्हणाले, “मी गरीब आहे हो. पर्समध्ये जेमतेम शंभर रुपये असतील; पण तेही मला फार आहेत."
 "वेडे, मला असं बक्षीस नकोय, ते म्हणाले. मी न समजून विचारलं, “मग काय देऊ तुम्हाला?”
 “मला तू हवी आहेस - शिष्या म्हणून. तू छान पळतेस. तुझ्यामध्ये विजेच्या धावपटूची क्षमता आहे. तुझी पावलं लांबसडक आहेत आणि स्प्रिंटही छान पडतात. यू आर नॅचरल रनर.”
 “खरंच सर. लहानपणापासून मला पळायला आवडतं." मी म्हणाले, "खरच मी छानपैकी रनर होईन?”

 "ऑफकोर्स; पण त्यासाठी तुला खूप मेहनत करावी लागेल. आणि स्वत:ला

१३२ लक्षदीप