पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "सर.... सर...' तिला काय बोलावं हेच कळत नव्हतं. फक्त मिठी अधिक घट्ट करीत त्याच्या छातीवर विसावली होती. “आय - आय अॅम प्राऊड ऑफ यू बेबी." “खरंच सर.... तिनं मान वर करीत त्याच्याकडे पाहिलं. आता गुरूचे आनंदाश्रू मुक्तपणे वाहत होते. हा नेहमीपेक्षा वेगळाच गुरू तिला वाटत होता. जणू तिला, तिच्या सुप्त मनाला कुठंतरी अबोधपणे कल्पिलेला गुरू गवसल्यासारखा वाटला. बेबीनं नकळत टाचा उंचावल्या आणि त्याच्या अश्रूभरल्या डोळ्यांवर ओठ ठेवले आणि ते अश्रूकण काही क्षण बेभानपणे टिपत राहिली...
 एका कॅमे-याचा फ्लॅश झळकल्याची जाणीव झाली. भानावर येत गुरूनं तिला दूर सारलं. “बेबी, भानावर ये. प्लीज.... आणि त्यानं वळून पाहिलं. एक परदेशी तरुणी, बहुधा हौशी क्रीडा फोटोग्राफर किंवा टुरिस्ट असावी. तिनं त्याच्या त्या बेभान पण फार उत्कट क्षणाला कॅमेराबद्ध केलं होतं! “इट इज सच ए टचिंग अॅण्ड टेंडर मोमेंट... आय कांट रेजिस्ट टू कॅप्चर इट...' तिनं खुलासा केला. “तुम्ही इथं कुठं उतरलात ते सांगा. रात्रीच कॉपी तुम्हा दोघांना पाठवीन. त्या रात्री हॉटेलच्या लाऊजमध्ये हॉटेल मालकानं विविध क्रीडा प्रकारांतील विजेत्या खेळाडूंसाठी खास कॅडललाईट डिनर दिलं होतं. एका टेबलावर ते दोघे होते. त्या परदेशी तरुणीनं पाठवलेलं ते रंगीत छायाचित्र त्यांच्या पुढ्यात होतं. ते किती सुरेख होतं.
 गुरू तिच्या चेह-यावरचे भाव पुन्हा पुन्हा निरखीत होता. तर त्याचे पाणावलेले डोळे किती बोलके आहेत, याची तिला जाणीव होत होती.
 त्याला तिच्या त्या बेभान मिठीचा स्पर्श पुन्हा पुन्हा आठवत होता. आपण तिच्यासाठी कोण आहोत? केवळ प्रवासात, ट्रेनमध्ये ती जे म्हणाली त्याचा अर्थ काय लावायचा? आणि आजचं तिचं वर्तन?
 नाही गुरू, तुझ्या तीव्र कल्पनाशक्ती असलेल्या मनाला थोपव. काहीही अर्थ, कोणतेही निष्कर्ष काढू नकोस.
 आजचा दिवस तिचा पराक्रम आणि ही कॅडललाईटमधील डिनरची रात्र नासवू नकोस... तुमच्या दोघांच्या नात्याला कसलंही लेबल लावू नकोस. ते फार गहिरं, फार सच्चं आणि परस्परांसाठी सुखद व प्रेरणादायी आहे, हे पुरेसं नाही का? गुरूनं ते मनातले ओढाळ विचार निग्रहानं बाजूस सारले आणि तिच्याशी तो हलकंफुलकं बोलू लागला.
 पण तिनं बोलताना अक्षरश: बॉम्बगोळाच टाकला. त्यावेळी त्याला वाटलं होतं, आपल्या मनात जे अस्फुट वाटत होतं हे केवळ कल्पनारंजन होतं.... तिच्यासाठी आपण केवळ गुरू - टीचर व फार तर जवळचे मित्र आहोत. बस.

 बेबीनं किमान आजचा दिवस व कॅडललाईट डिनरची ही सुखद संध्याकाळ नासवायला नको होती. आपण त्यासाठी मनाला थोपवलं होतं. पण...

लक्षदीप ॥ १२७