पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होते 'सर' - तिच्या गुरूसाठी. त्याच्यासाठी कोमात गेलेली बेबी काही क्षण शुद्धीवर आली होती. तेव्हा आपण तिच्या नजरेसमोर होतो. त्या 'बर्न वॉर्डमध्ये मोठ्या डोलान्यात तिचं ऐंशी-पंचाऐंशी टक्के भाजलेलं शरीर झाकून ठेवलं होतं. चेहरा तेवढा बाहेर होता. त्याला वार्ता समजताच मागचा पुढचा विचार न करता तो धावत दवाखान्यात आला होता. आणि त्याच वेळी तिला शुद्ध आली होती.
 गुरूला बेबीनं ओळखलं होतं. ती काहीशी हसली आणि पुटपुटली “सर.... सर....' पुढे तिला काही बोलायचं होतं, पण बोलू शकली नाही. पाहता पाहता तिची नजर ताठरत स्थिर झाली. तिची प्राणज्योत त्या क्षणी निमाली होती! बेबीचा नवरा बालाजी फूत्कारला, “बघितलंस आई, मरतानाही छिनाल त्याचंच नाव घेत होती. तूच सांग, तिची अंतिम इच्छा कशी मान्य करायची?"
 गुरूच्या तीक्ष्ण कानांनी कुजबुजीचा तो फूत्कार नेमका टिपला होता. मृत्यूबरोबर संबधितांबाबतचा राग-लोभ संपतो, त्याचा अंत होतो, असं आपलं धर्मशास्त्र व संस्कार सांगतात. हे खोटं म्हणायचं? बालाजीचा तिच्यावरचा राग तिच्या मृत्यूनंतर संपला नव्हता, पण बेबीची अंतिम इच्छा काय होती? त्याच्याशी आपला काही संबंध असावा.... कुणाला विचारावं? हा प्रश्न होता. थेट बालाजीला विचारणं शक्य नव्हतं. नाहीतर त्या दिवशी केला तसा त्यानं तमाशा केला असता.
 गुरूला दवाखान्यातून सुन्न मनानं बाहेर पडताना बालाजीच्या चुलत भावानं, व्यंकटनं गाठलं. “सर, थोडं थांबा." गुरू चालता चालता मागून आलेल्या हाकेनं थबकला होता. व्यंकटही त्याचा शिष्य होता. दोन तीन वर्षं त्याच्याकडे अॅथलेटिक्सचे कोचिंग घेत होता. पण नंतर घरच्या व्यवसायाकडे वळल्यामुळे त्यानं मैदान सोडलं होतं, “सर, बेबी वैनीनं स्वत:ला जाळून घेतलं. तिला आम्ही दवाखान्यात आणताना माझ्या काकूला, तिच्या सासूला, ती म्हणाली होती. “मला जगायचं नाही आणि मरण आलं तर माझ्या चितेला ह्यांनी नाही, तर सरांनी अग्नी द्यावा. नाही तर मला मुक्ती नाही मिळणार...."
 "क..क... काय? अशी तिची शेवटची इच्छा होती?”
 होय सर!' व्यंकट म्हणाला, "आणि तुम्हाला ती पुरी केली पाहिजे!”
 "पण ते कसं शक्य आहे व्यंकट!" गुरू अस्वस्थ होत म्हणाला “अरे, काही झालं तरी तिचं लग्न झालं होतं आणि बालाजी तिचा धर्माचा नवरा आहे."
 "नवरा?” व्यंकट संतापानं थरथरत बोलला, “सैतान, पण तोही परवडला असता, त्या पलीकडचं काम होतं आमच्या बालाजीचं, खरं सांगतो सर, त्याला भाऊ म्हणून घेण्याचीही शरम वाटते. त्याच्यामुळेच वैनीनं जाळून घेतलं असणार..."

 गुरू कमालीचा हतबुद्ध. कानात व्यंकटचे शब्द शिशाप्रमाणे भरले जात होते आणि त्याचं अंतर्मन दग्ध होत होतं. नजरेसमोर बेबीचा उत्स्फूर्त चेहरा, ओठावरचं

लक्षदीप । १२५