पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ब्लंटली म्हटलं होतं, “नो, ही इज नॉट कन्सीडिर्ड अॅट ऑल. आय डोंट थिंक, ही विल हॅव एनी चान्स टू कम बँक.”
 पुन्हा एकवार कर्णाची कवचकुंडली काढली गेली होती. त्या कर्णाला समाधानाची दोन कारणं तरी होती. एकतर त्यानं इंद्रासारख्या राजाला याचक म्हणून विनवणी करीत आल्यामुळे दान करून दानवीराची दिगंत कीर्ती मिळवली होती. आणि कवचकुंडलाविनाही त्याला युद्धभूमीवर लढता येत होतं. किमानपक्षी वीरमरण तरी निश्चित होतं.
 पण हॅम युद्धभूमीही हरवून बसला होता. न लढता, न खेळता पराभूत होणं, मिटन जाणं हे आता आपलं नशीब आहे आणि ते बदलण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे हे त्याच्या मनानं त्याला ब्लंटली बजावलं होतं. “यस, आय अॅम टोटली फिनिशड निल... जिथं अमेरिकेतही रंगभेदामुळे कृष्णवर्णीयाचं निर्विवाद वर्चस्व असणा-या बास्केटबॉल या खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिला जात नाही, तिथं भारतात माझी काय पत्रास? एक तर मी तसा काळा आहे. पुन्हा दलित.. धिस एज ए डिस्गस्टिंग कॉम्बिनेशन, वुईच कॅन रुईन एनीबडी...”
 "हॅम, डोंट लूज़ हार्ट, अरे व्हीनस, सेरेनाकडं पाहा. झिम्बाबेच्या ओलोंगाकडे पाहा. यू विल कम बॅक अगेन, आय अॅम कॉन्फिडंट."
 “नाही निलू... माझ्या मनाची आत्मविश्वासरूपी कवचकुंडलंही आता गळून पडली आहेत. मी - मी संपलो गं..." तिच्याकडे पाणावल्या नेत्रानं पाहात छिन्नछिन्न स्वरात भयव्याकूळ होत हॅमनं विचारलं, “ज्या डॅशिंग क्रिकेटियरवर तू प्रेम केलंस. तो संपला आहे. त्याचा तिरस्कार नाही ना करणार? एक वेळ तेही चालेल. पण प्लीज, माझी कीव करू नकोस चुकूनही कधी, नहीं तो मैं जीतेजी मर जाऊंगा. यकिनन मर जाऊंगा..."
 सॅम आला. त्याच्याशी व निलूशी पूर्वीप्रमाणेच दिलखुलास बोलला, हॅमनंही स्वत:ला सावरलं होतं. त्याचा निरोप घेऊन परतताना लिफ्ट तांत्रिक कारणांनी बंद पडली हेती. तेव्हा तो जिन्यावरूनच जिने पायी उतरून जाण्यासाठी सज्ज झालेल्या सॅमला म्हणाला, "मला लिफ्टनं भराभर वर जात तुला गाठायचं होतं... पण माझी ही लिफ्ट बंद बडलीय मित्रा, कायमची, पुन्हा कधीही सुरू होणार नाही."
 आणि खदाखदा हसत, भसाडा आवाज काढीच हॅमनं तान मारली. “कैसे मैं आऊ? लिफ्ट मेरी बंद है...."
 सॅम त्याच्याकडे किती वेळ तरी मूढमुग्धासारखा अवाक होऊन पाहात राहिला श्रीमंत सोसायटीमधील उच्चभ्र नीतिनियमांची पर्वा न करता हॅम गातच राहिला, गातच राहील... लिफ्ट मेरी बंद है. लिफ्ट मेरी बंद है....


०-०-०

लक्षदीप । १२३